पुणे : मामा रागवल्याने ‘त्यांनी’ सोडले घर! पण पोलिस मामांनी पोहोचविले सुखरूप!! | पुढारी

पुणे : मामा रागवल्याने ‘त्यांनी’ सोडले घर! पण पोलिस मामांनी पोहोचविले सुखरूप!!

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरानजीकच्या गुणवडी गावातून चार अल्पवयीन मुली व एक मुलगा, असे पाच जण बेपत्ता झाल्याची तक्रार सोमवारी (दि. 22) सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिसांना या पाचही भावंडांचा शोध घेण्यात अखेर रात्री आठच्या सुमारास यश आले. मामा अभ्यासावरून रागवल्याने ही पाच मुले घरातून पळून गेल्याचे पोलिस तपासात समोर आले.

गुणवडीतील चार मुली व एक मुलगा सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून घरातून गायब झाले. दोन सख्ख्या बहिणींची ही पाच मुले आहेत. त्यात दोघा बहीण-भावाचा, तर तिघा सख्ख्या बहिणींचा समावेश होता. या तिघी बहिणी मावशीकडे आल्या होत्या. एकाच घरातून पाच अल्पवयीन बहीण-भावंडे बेपत्ता झाल्याने गुणवडीत लहान मुलांना पकडणारी टोळी आली असल्याची अफवाही पसरली होती. सायंकाळी चार वाजता शहर पोलिस ठाण्याला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार निरीक्षक सुनील महाडीक, उपनिरीक्षक युवराज घोडके, तुषार चव्हाण, अक्षय सिताप, शाहू राणे आदींना तत्काळ तपासाच्या सूचना दिल्या. तपास सुरू केला असता मेखळी येथे एका दुकानदाराने ही मुले वालचंदनगरचा रस्ता विचारत होती, असे सांगितले. एवढ्या एका धाग्यावरून पोलिसांनी वालचंदनगर बाजूला तपास सुरू केला.

पोलिसांना सायंकाळी सातच्या दरम्यान वालचंदनगर-जंक्शन या ठिकाणी प्रथम दोन मुली मिळून आल्या. त्यांना ओमनी गाडीत बसवून एकाने मामाकडे भेटायला जात आहे, असे सांगत आम्हाला येथे आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी वेगाने इतर बेपत्ता मुलांचा शोध सुरू केला. काही वेळानंतर त्याच भागात आणखी दोन मुली मिळून आल्या. त्यामुळे पोलिसांचा जीव भांड्यात पडला. कौशल्याने सर्वांना विश्वासात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, कोणीही त्यांचे ओमनी गाडीतून अपहरण केले नसल्याचे स्पष्ट झाले.

अभ्यास करत नाही, या कारणावरून मामा रागविल्याने त्यांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. पोलिस आणि नातेवाईक रागावतील म्हणून त्यांनी ओमनी गाडीत बसवून नेल्याचा बनाव या मुलांनी रचल्याचे स्पष्ट झाले. यातील एका मुलाने घरातच चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने, आमचा शोध घेऊ नका, आम्ही मोठे बनूनच घरी येणार, असा मजकूर लिहिला होता. चार मुली सापडल्या, परंतु एक अल्पवयीन सापडत नसल्याने पोलिसांनी शोध सुरूच ठेवला. काही वेळाने त्याचाही त्याच परिसरात शोध लागला.

संवेदनशीलपणे तत्काळ तपास

एकाच वेळी पाच अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या प्रकाराने पोलिसही हादरून गेले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तत्काळ तपास सुरू केला. कौशल्याने तपास करत अल्पवयीनांना शोधून काढले, त्याबद्दल पोलिस पथकाचे कौतुक होत आहे.

लहानग्यांशी प्रेमाने वागा

लहान मुले संवेदनशील असतात. एखाद्याच्या रागावण्यावरूनही ते नको त्या गोष्टी करतात, त्यामुळे लहानग्यांच्या भावना लक्षात घेत पालकांनी त्यांच्याशी वर्तणूक ठेवली पाहिजे, असा सल्ला देत पोलिसांनी ही मुले त्यांची आई व मामा यांच्या ताब्यात दिली.

Back to top button