नाशिक : ऑगस्टमध्येच पावसाने ओलांडली सरासरी; जिल्ह्यात यंदा कमी वेळेत अधिक पर्जन्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात पावसाने दमदार पुनरागमन केले असून, दोन दिवसांपासून त्याचा जोर वाढला आहे. नदी-नाले खळाळून वाहू लागले आहेत. धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. ऑगस्टच्या मध्यात पावसाने महिन्याची सरासरी ओलांडली आहे. चालू महिन्यात 118 टक्के पर्जन्याची नोंद झाली आहे. चार तालुके वगळता उर्वरित सर्व ठिकाणी पावसाने ऑगस्टची सरासरी ओलांडली आहे.
यंदाच्या वर्षी जिल्हावासीयांना पावसाचा लहरीपणा अनुभवायला मिळत आहे. देशात यंदा वेळेआधी मान्सूनने आगमन केले असले तरी जून महिन्यात जिल्ह्यात पावसाने ओढ दिली. संपूर्ण जून महिन्यात सरासरीच्या 75 टक्क्यांच्या आसपासच पर्जन्याची नोंद झाली. त्यामुळे सर्वत्र संकट दाटले असताना 9 ते 15 जुलै या काळात पावसाने धुवाधार बॅटिंग करत चित्र पालटून टाकले. कमी कालावधीत झालेल्या संततधारे मुळे नदी-नाले दुथडी वाहू लागले. तर धरणांमध्येही मुबलक पाणीसाठा निर्माण झाला. त्यावेळी अवघ्या आठवडाभरात पावसाने जुलै महिन्याची सरासरी ओलांडली होती. कमी कालावधीतील हा ट्रेण्ड पावसाने चालू महिन्यातही कायम ठेवला आहे. ऑगस्ट महिन्याचे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 120.5 मिमी इतके आहे. मात्र, चालू महिन्यात पावसाचे आकडे बघता त्याने ऑगस्टची सरासरी कधीच ओलांडली आहे. आतापर्यंत सरासरी 143 मिमी पाऊस झाला असून, ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या 118 टक्के इतके हे प्रमाण आहे. पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे चार तालुके वगळता उर्वरित नऊ ठिकाणी पावसाने सरासरी गाठली आहे. बागलाण तालुक्यात ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या 347 टक्के पर्जन्याची नोंद झाली आहे. त्या खालोखाल देवळ्यात 299, सिन्नर 268, तर मालेगावी 256 टक्के पाऊस झाला. नाशिक तालुक्यातही सरासरीच्या 145 टक्के पर्जन्याची नोंद झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने सरासरीच्या टक्का वाढणार आहे.
ऑगस्टचे आजपर्यंतचे पर्जन्य (मिमी)
मालेगाव 124.7, बागलाण 164.1, कळवण 109.6, नांदगाव 119.1, सुरगाणा 135.5, नाशिक 112.5, दिंडोरी 138.7, इगतपुरी 300.4, पेठ 157.2, निफाड 113, सिन्नर 133.4, येवला 94.5, चांदवड 134.2, त्र्यंबकेश्वर 254.7, देवळा 142.6.
आतापर्यंत 87 टक्के पर्जन्याची झाली नोंद
जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 933.8 मिमी इतके आहे. चालू वर्षी 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरीच्या 808 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वार्षिक सरासरीशी तुलना केल्यास आजपर्यंत जिल्ह्यात 86.5 टक्के पर्जन्य झाले आहे.