धुळे : ईडीच्या विरोधात धुळे जिल्हा शिवसेना आक्रमक, रास्ता रोको करून कारवाईचा निषेध | पुढारी

धुळे : ईडीच्या विरोधात धुळे जिल्हा शिवसेना आक्रमक, रास्ता रोको करून कारवाईचा निषेध

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्याचे धुळ्यात तीव्र पडसाद उमटले आहे. धुळे जिल्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल सायंकाळी मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांचे टायर जाळीत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह भारतीय जनता पार्टीवर गंभीर शब्दात शेरेबाजी करण्यात आली.

धुळ्यात ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करीत आपला रोष व्यक्त केला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे, प्रफुल्ल पाटील, विनोद जगताप, भरत मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या कार्यकर्त्यांनी महामार्गावर टायर पेटवून दोन्ही बाजूची रहदारी रोखून धरल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पार्टीवर गंभीर शब्दात टीका केली आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना अल्पसंख्यांक आघाडीचे किरण जोंधळे यांनी सांगितले की, देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रीय संघटनांचा चुकीच्या पद्धतीने वापर करीत आहे. महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने भाजपाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना खोट्या आरोपात अडकवण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र या विरोधात शिवसेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सायंकाळी उशिरापर्यंत महामार्गावरील रहदारी सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा :

Back to top button