शिंदे गटाकडून पोखरापूर गटात स्थानिक उमेदवार | पुढारी

शिंदे गटाकडून पोखरापूर गटात स्थानिक उमेदवार

मोहोळ : पुढारी वृत्तसेवा पोखरापूर जिल्हा परिषद हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामध्ये वरवडे आणि पोखरापूर असे दोन पंचायत समिती गण येत आहेत. या पोखरापूर गटातीलच अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार देण्याची आमची योजना आहे. त्यादृष्टीने यामधील गावातून एका होतकरू उमेदवाराला उमेदवारी देऊ. त्यासाठी जिल्ह्याचे समन्वयक मनीष काळजे, प्रशांत भोसले यांच्यासहित आम्ही सर्व मुख्यमंत्री शिंदे यांच्या विचारांचा उमेदवार निवडून आणण्यास कटिबद्ध असून मख्यमंत्री व शिवसेना उपनेते आ. तानाजी सावंत यांचा आदेश अंतिम असल्याचे नागेश वनकळसे म्हणाले.

वनकळसे म्हणाले, 2009 पासून मोहोळ विधानसभा राखीव असून येथे कायम गेटकेन उमेदवार लादून निवडून आले आणि इथे पराभूत झालेल्या उमेदवारावर बोलणे उचित राहणार नाही. त्यामुळे किमान जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तरी त्या त्या गटातील, गणातील उमेदवार देऊन त्यांना निवडून आणण्याचे शिवधनुष्य आम्ही उचलणार असल्याचे वनकळसे म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी सामान्य माणसाला असामान्यत्व देण्याचे जे काम केले. तीच हिंदुत्वाची विकासाची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू ठेवली आहे. त्यामुळे तालुक्यातील तरुण वर्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आकर्षित होत आहे.

पोखरापूर जि.प. गटामधून स्थानिक उमेदवार आम्ही सहज निवडून आणू शकू. कारण आमच्याकडे त्याच गटातील मतदार असणार्‍या तगड्या उमेदवारांची आग्रही मागणी आली असून गेटकेन उमेदवाराला उमेदवारी देणार नसल्याची आमची भूमिका आहे. वर्षानुवर्षे संघर्ष करणार्‍या त्या समाजाला काहीच मिळत नाही. बाहेर गेटकेनला संधी दिली तर त्याचा जनतेशी संपर्क आणि नाळ जोडली जात नाही, तेथे स्थानिक नेतृत्व कधी तयार होत नाही. म्हणून स्थानिक जनतेशी नाळ जोडण्यासाठी स्थानिक उमेदवार ही आमची भूमिका असल्याचे म्हटले आहे. स्थानिक उमेदवार दिला तर या येथील तरुणांची तसेच नागरिकांची कामे होतील. जेणेकरून कुणाचीही अडचण होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करण्याचे आवाहन नागेश वनकळसे यांनी व्यक्त केले.

Back to top button