जळगावात दगडाने ठेचून तरुणाची हत्या, दोन संशयित ताब्यात | पुढारी

जळगावात दगडाने ठेचून तरुणाची हत्या, दोन संशयित ताब्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

येथील पिंप्राळा रेल्वे फाटकाजवळ रात्री उशिरा दगडाने ठेचून तरुणाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

रेल्वे फाटकाजवळच्या मालधक्क्यासमोर रात्री तरुणाचा मृतदेह आढळला. याबाबत पोलिसांनी तपास करून संबंधित तरुणाची ओळख पटविली. अनिकेत गणेश गायकवाड (२०, रा. राजमालतीनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांना पहाटे अडीच वाजता याबाबत माहिती देण्यात आली.

कपड्यांवरून पटली ओळख

मृत तरुणाचे वडील गणेश रमेश गायकवाड यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली. रात्री साडेआठच्या सुमारास कामावरून घरी आल्यावर मुलगा अनिकेत घरी दिसला नाही. त्याचे घरी येणे-जाणे अनियमित होते. रात्री अडीचच्या सुमारास गल्लीतील अर्जुन धोबी हे पोलिसांसोबत घटनास्थळी येऊन अनिकेतसारख्या व्यक्तीचा मृतदेह आढळल्याचे सांगितले. त्यानुसार खातरजमा करण्यासाठी प्रेताच्या अंगावरील कपड्यावरून व त्याच्या हातातील कड्यावरून व पायातील काळ्या रंगाचा दोर्‍यावरून तो मृतदेह अनिकेतचाच असल्याचे निष्पन्न झाले.

घटनास्थळी मद्याच्या बाटल्या

घटनास्थळापासून काही अंतरावरच मद्याच्या बाटल्या आढळल्यामुळे खून करण्यापूर्वी मारेकर्‍यांनी अनिकेतला जबरदस्तीने मद्य पाजून त्यानंतर खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच मारेकरी हे मृत तरुणाच्या परिचयातील असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button