जालना : विद्युत पोलचा शॉक लागल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू | पुढारी

जालना : विद्युत पोलचा शॉक लागल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

जालना, पुढारी वृत्तसेवा : विद्युत पोलमध्ये वीजेचा प्रवाह उतरल्याने एका १४ वर्षाच्या मुलाचा बळी गेला. ही दुर्घटना मंगळवारी( दि. २४) रोजी शहरातील राहुल नगर मध्ये घडली आहे. या प्रकरणी मृत मुलाच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यकांत उर्फ मोनू सर्जेराव म्हस्के असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे.

मोनू हा मंगळवारी सायंकाळी राहुल नगर परिसरातील गल्लीत खेळत होता. या ठिकाणी असलेल्या विद्युत पोल मधील विजेचा प्रवाह परिसरात असलेल्या लोखंडी सळ्यामध्ये उतरला.

यावेळी अचानकपणे त्या लोखंडी सळ्याना त्याचा हात लागल्याने त्याला शॉक बसला. यातच मुलाच्या मृत्यू झाल्यामुळे परीसरात एकच शोककळा पसरली. दरम्यान, राहुल नगर परिसरात विद्दुत पोल मध्ये गेल्या दोन दिवसांपासून विद्युत प्रवाह उतरत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. या बाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळवले होते. हावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे
मोनूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला होता. पोलिसांनी रात्री उशिरा या परिसरातील विद्युत पोलची पाहणी केली. दरम्यान, मृत मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून संबधितांवर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मजहर सय्यद यांनी दिली आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button