नाशिक : मोसम नदी स्वच्छता न झाल्यास गांधीगिरी: सार्वजनिक नागरी सुविधा समितीचा इशारा | पुढारी

नाशिक : मोसम नदी स्वच्छता न झाल्यास गांधीगिरी: सार्वजनिक नागरी सुविधा समितीचा इशारा

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा : शहर स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असताना नियोजनशून्य कामांमुळे मोसम नदी प्रचंड प्रदूषित झाली आहे. दुर्गंधी पसरून नागरी आरोग्याला धोकादायक ठरलेल्या या नदीपात्राची स्वच्छता न झाल्यास मंगळवारी (दि.10) गांधीगिरी आंदोलन करण्याचा इशारा सार्वजनिक नागरी सुविधा समितीने दिला आहे. यासंदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांची भेट घेत चर्चा केली.

मोसम नदीपात्रात सांडपाणी तुंबू नये, यासाठी गटार करण्यात आली. त्यावरील निधी व्यर्थ गेल्याची स्थिती सध्या पाहायला मिळते. सध्या अमृत योजनेंतर्गत नदीपात्रात खोदकाम सुरू आहे. या कामामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले असून, नदीचा प्रवाहच बदलला आहे. अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबू लागले आहे. त्यात शहरभरातील गटारी व नाल्यातून येणारे प्रदूषित पाणी साचते. मेलेली जनावरे, घाणकचरा थेट नदीत टाकले जात असल्याने पाण्याच्या डबक्यातून प्रचंड उग्र वास पसरत आहे. डासांचे आगार झाले आहे. नदी परिसरातील नागरिकांना डासांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात गेल्या 12 एप्रिलला प्रभाग एक कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाप्रसंगी ऊहापोह झाला होता. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. मोसम नदीचा पूर ओसरावा, यासाठी सुवासिनी नदीला साडीचोळी वाहतात. त्याप्रमाणे नदीचे सौंदर्य टिकवावे या मागणीसाठी मनपाला 21 मीटरची साडी व चोळी देऊन ओवाळणी करण्यात येईल, असा उपरोधिक इशारा समितीचे रामदास पगारे, भरत पाटील, कैलास शर्मा, भालचंद्र खैरनार आदींनी दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button