Sakri : जबरदस्ती करत महिलेचा निर्घृण खून, मृतदेह पुरला शेताच्या बांधावर | पुढारी

Sakri : जबरदस्ती करत महिलेचा निर्घृण खून, मृतदेह पुरला शेताच्या बांधावर

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यात साक्री (Sakri) तालुक्यातील नवडणे येथे एका महिलेवर जबरदस्ती करत तिचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर मृतदेह शेताच्या बांधावर पुरण्यात आला. दरम्यान शेतात अर्धवट पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

कपड्यांवरून महिलेची ओळख पटली असून याप्रकरणी साक्री पोलिसात एका संशयीत आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. साक्री (Sakri) तालुक्यातील नवडणे शिवारात एका महिलेचा अर्धवट पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

ही बाब कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. तर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप मैराळे, साक्रीचे तहसिलदार प्रवीण चव्हाणके, साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला व पंचनामा करण्यात आला.

मृत महिलेची तिच्या कपड्यांवरून ओळख पटली. अनुसया सोनु अहिरे ( वस २३ रा. नवडणे) असे तिचे नाव आहे. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून संशयित अशोक सतिश सोनवणे ( वय २१ रा.नवडणे ) यास ताब्यात घेतले.

याबाबत मृत महिलेचा पती सोनु साहेबराव अहिरे याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक सोनवणे हा मृत महिलेला नेहमी वाईट नजरेने पाहत असे. म्हणून त्याने तिला घरातून जबरीने घेवून जावून तिच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर तिच्या डोक्यात दगड टाकून तिचा खून केला. तिचा मृतदेह गाव शिवारातील रामा माणिक सोनवणे यांच्या शेताच्या बांधाजवळ पुरला, असा संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार साक्री पोलीस ठाण्यात अशोक सोनवणे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीआय अजयकुमार चव्हाण हे करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button