नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा : नांदगाव तालुक्यातील आमोदे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संसारोपयोगी वस्तू, घरात असलेली पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम यासह दोन शेळ्या भाजल्याने जागीच ठार झाल्या. या स्फोटात एक दुचाकी देखील जळाली आहे.
गावाच्या बाहेर राहणारे सोमनाथ महादु पाटील (वय ३० ) यांच्या घरात (दि. २१) सिलेंडरचा स्फोट होऊन संसारोपयोगी वस्तू सह रोख रक्कम व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत महसूल विभागाला या घटनेची माहिती दिली असता महसूलचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी झालेला घटनेचा पंचनामा करत झालेल्या नुकसानीची नोंद केली आहे. यात रोख रक्कम ५० हजार रुपये, संसार उपयोगी वस्तू तसेच मोटर सायकल जळून खाक झाली. भाजल्याने दोन शेळ्या जागीच मृत्यूमुखी पडल्या.