नाशिक (लासलगाव) वार्ताहर : नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर येथे प्रेमसंबंधातून तरुणाला जिवंत जाळल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे प्रेमसंबंधातून धारदार शस्त्राने युवकावर वार केल्याने युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्रवीण रावळा जाधव असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या युवकावर नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला असून या युवकावरही विनयभंग केल्याप्रकरणी तरुणीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथील नंदावननगर येथे युवक प्रवीण रावळा जाधव या युवकाने 21 वर्षीय तरुणीच्या घरी सोमवारी रात्रीच्या सुमारास जाऊन गोंधळ घालत तुझ्या आईने माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. तुझ्या नातेवाईकांच्या विरोधात जातीवाचक गुन्हा दाखल करेल असे म्हणत 21 वर्षीय तरुणीचे हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत आई आणि भावास शिवीगाळ दमदाटी केल्याने तरुणीच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण रावळा जाधव हा युवक घरी जेवण करत असताना तरुणीचा भाऊ आणि दोघे साथीदार अशा तिघांनी प्रवीणवर धारदार शस्त्राने पोटावर वार केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या दरम्यान घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात वेळेत दाखल केल्याने या युवकाचे प्राण वाचले आहे.
याप्रकरणी सीमा रावळा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हल्ला करणार प्रथमेश कैलास सरोदे, शुभम कैलास सरोदे, आणि दीपक अजय नवले यांना प्रवीणचे 21 वर्षीय तरुणीसोबत प्रेम संबंधाची माहिती पडल्याने जीवे ठार मारण्याची धमकी देत धारदार शस्त्राने हाता पोटावर वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फिर्याद दिल्याने या तिघांवर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आर.के. आहिरे, वाडीलाल जाधव करत आहे.