नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आयटी हबसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर केल्यास तत्काळ नाशिक महापालिकेच्या आयटी हबला परवानगी दिली जाईल. भिवंडीत साकारणार्या आयटी हबलाही परवानगी दिली जाणार असल्याचे आश्वासन सूक्ष्म व लघुउद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले. दरम्यान, आयटी हब प्रकल्पात शिवसेनेकडून अडथळा आणला जात असल्याचा आरोप करत ना. राणे यांनी मनपा आयुक्तांच्या अनुपस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
नाशिक महापालिकेतर्फे तसेच महापौर सतीश कुलकर्णी यांचा महत्त्वाकांक्षी आयटी हब प्रकल्प आडगाव शिवारात साडेतीनशे एकरांवर साकारण्यात येणार आहे. त्यासंदर्भात हॉटेल गेट वे येथे आयोजित आयटी कॉन्क्लेव्हप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर नाशिकचे सहप्रभारी आमदार जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, भाजप प्रदेश सरचिटणीस देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, आमदार अॅड. राहुल ढिकले, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, प्रदीप पेशकार, हिमगौरी आहेर आडके आदी उपस्थित होते. कार्यक्रमात पुढे बोलताना ना. राणे यांनी आयटी पार्कसंदर्भात सुरू असलेल्या राजकारणावर बोट ठेवत शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला.
शहर विकासात विरोधाचे राजकारण आणणे योग्य नव्हे. उद्योग, व्यवसाय वाढीसाठी आपण पुढे येत उद्योजकांचे स्वागत केले पाहिजे. परंतु, नाशिकमधील विरोध पाहता मी येणार म्हणून आयुक्तांवर दबाव आणून त्यांना येण्यापासून रोखण्यात आले. हिंदू धर्म आणि मराठी माणसांच्या न्याय्यहक्कांसाठी लढताना आज शिवसेना कुठेही दिसत नाही. अणु ऊर्जा प्रकल्प नको म्हणून आंदोलन करणार्या शिवसेनेच्या पदाधिकार्यांनीच सर्व जमिनी घेतल्याचा आरोपही ना. राणे यांनी केला. नवी मुंबईतील विमानतळाबाबतही हीच भूमिका शिवसेनेने घेतली. नाशिकमधील आयटी पार्कलाही माझ्यामुळेच विरोध केला जात असल्याचा दावा करत विकासाला विरोध करणारा पक्ष म्हणजेच शिवसेना, अशी टीकाही त्यांनी केली.
तमिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, गुजरात हे राज्य पुढे चालले असून, महाराष्ट्र मागे पडत असल्याची बाब निदर्शनास आणून देत महाविकास आघाडी शासनाकडे पत्रव्यवहार करूनही लघुउद्योगांसंदर्भातील बैठक बोलविण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. कार्यक्रमात आयटी हबसंदर्भात विविध प्रकारच्या माहितींचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, भाजप नेते विजय साने, गटनेते अरुण पवार, सभागृहनेते कमलेश बोडके, रवि महाजन, ऋषिकेश वाकदकर, प्रकाश पाठक, विवेक जायखेडकर, पीयूष सोमाणी उपस्थित होते.
या कंपन्यांचा सहभाग
आयटी परिषदेत नाशिकमधील सुमारे शंभरहून अधिक कंपन्यांसह मुंबई, पुण्यातील टीसीएस, सिंटोल, रिबीट, इन्फोसिस, विप्रो, केपी अशा प्रख्यात विविध कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला.
दीड हजार कोटींचा महसूल : महापौर
परिषदेत आयटी हब प्रकल्पाविषयी माहिती देताना या प्रकल्पाचे शिल्पकार महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयटी हब, लॉजिस्टिक पार्क आणि बीओटी या तीन प्रकल्पांतून महापालिकेच्या उत्पन्नात 1500 कोटींच्या महसुलाची भर पडणार असल्याचा दावा केला. 2012 पासून आयटी पार्कविषयी पाठपुरावा सुरू असून, याच काळात दोन हजार विद्यार्थ्यांचा वॉकेथॉन आयोजित करण्यात आला होता. कोरोना काळात आयटी हबबाबत कार्यवाही करता आली नाही. त्या काळात केवळ आरोग्य सुविधांना प्राधान्य देत नागरिकांना सेवा पुरविण्यात आल्या. आयटी हबमुळे नाशिकच्या युवकांना नाशिकमध्येच रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्रिपदासाठी गद्दारी
विकासकार्यात राजकारण आणून विरोध करण्यापेक्षा आम्हाला विरोध करा, त्यासाठी आम्ही मैदानात आहोत, असे सांगत मागील वर्षी आॉगस्टमध्ये पक्षाची आशीर्वाद यात्रा काढण्यात आली असता आमदार नितेश राणे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव काही पक्ष (शिवसेनेचे नाव न घेता) केवळ स्वत:ची रोजीरोटी सुटावी आणि पक्ष चालावा म्हणून घेत असल्याची टीका राणे यांनी केली. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने भाजपबरोबर गद्दारी केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
महापौरांचा प्रशासनावर आरोप
मनपा प्रशासनाकडून विकासकामे आणि प्रकल्पांमध्ये दबावापोटी जाणूनबुजून अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा सडेतोड आरोप महापौर सतीश कुलकर्णी यांनी करत प्रशासनाच्या कारभाराचा पाढाच वाचला. आयटी हब, बीओटी याबाबत प्रक्रिया पूर्ण झालेली असताना केवळ करू, बघू अशीच भूमिका घेतली जात असल्याची बाब ना. राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. आयुक्तांनी स्वत: अंदाजपत्रक सादर करतेवेळी बीओटी प्रकल्पातून मनपाला सुमारे एक हजार रुपयांचा महसूल मिळू शकतो, असे सांगितल्याचे महापौरांनी नमूद केले.
आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रिअल पार्क हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे करण्यासाठी आमचा प्रयत्न असून, त्याची सुरुवात झाली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून नाशिकचा विकास साध्य करणे शक्य होणार आहे. त्याकरिता नाशिकचे वातावारण योग्य आहे. – जयकुमार रावल, आमदार
नाशिकचा आयटी पार्क हा लॉन्ग मार्च ठरणार आहे. अशा प्रकारचा आयटी पार्क उभारणारे नाशिक हे देशातील पहिलेच शहर असणार आहे. या पार्कसाठी केंद्र सरकारकडून सर्वोतोपरी मदत मिळेल यात काहीही शंका नाही.
– देवयानी फरांदे, आमदार
आयटी पार्कसाठी डिसेंबर 2020 मध्ये सर्वप्रथम तरतूद
केली होती. आडगाव हे ठिकाण निवडण्याचे कारण म्हणजे येथील कनेक्टिव्हिटी उत्तम आहे. ओझर विमानतळ, नाशिक-इंदूर हायवे, रेल्वेस्टेशन हे सर्वच जवळ असल्याने या ठिकाणी आयटी पार्क होऊ शकते.
– हर्षल बाविस्कर, सहायक, नगररचना
आयटी पार्कला लागून हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था असल्याने त्याचाही विकास होणार आहे. कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने आयटी पार्क योग्य आहे. सुमारे चारशे हेक्टरचे हे प्रपोजल असून, डीपी रोडचा विचार करून प्लॅन बनविण्यात आला आहे. – विवेक जायखेडकर, आर्किटेक्ट
डजिटल इंडियाच्या माध्यमातून आयटी पार्कचा पाठपुरावा करायला हवा. आयटी पार्कच्या माध्यमातून शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, रोजगार निर्मितीबरोबरच रिअल इस्टेट आणि इन्फ—ास्ट्रक्चर डेव्हलपर्संनाही याचा मोठा फायदा होईल.
– प्रदीप पेशकार, सदस्य, एमएसएमई
आयटी क्षेत्रात क्वॉलिटी आणि सर्टिफिकेशनला खूप महत्त्व आहे. त्याचेच काम या पार्कच्या माध्यमातून केले जाणार आहे. हे पार्क म्हणजे नाशिकच्या आयटी उद्योगांना बळ, असेच म्हणता येईल. इतरही आयटी कंपन्यांनी नाशिकमध्ये येण्यास उत्सुकता दाखवावी.
– ऋषिकेश पाटणकर, अध्यक्ष, निटा
नाशिकमध्ये जागा उपलब्ध करून दिल्यास, एसटीपीआय सेंटर होऊ शकते. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता सरकारी स्तरावरही आम्हाला पाठबळ देणे गरजेचे आहे. त्याकरिता ना. नारायण राणे यांनी आमच्या प्रमुख मागण्यांचा विचार करावा.
– पीयूष सोमाणी, ईएसडीएस
शहरात सध्या 250 पेक्षा अधिक आयटी कंपन्या असून, त्यांनी ठरविल्यास काय होऊ शकते, हे या कॉनक्लेव्हवरून सांगता येईल. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा प्रकल्प असून, त्यातून आयटी उद्योग भरभराटीस येईल. – अरविंद महापात्रा,
संस्थापक अध्यक्ष, निटा
आयटी पार्कच्या माध्यमातून नाशिकचे महत्त्व देशभरात पोहोचणार आहे. एनडीटी ग्लोबल ही गुंतवणूक करणार असून, मोठ्या कंपन्यांनी नाशिकमध्ये येण्यास उत्सुकता दाखवावी. – चेतन सोनार,
एनडीसी ग्लोबल