murder : सेलू उपजिल्हा रुग्णालय परिसरात विटा डोक्यात मारून वेटरचा खून | पुढारी

murder : सेलू उपजिल्हा रुग्णालय परिसरात विटा डोक्यात मारून वेटरचा खून

सेलू , पुढारी वृत्तसेवा : सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागासमोरील ओट्याजवळ आज (मंगळवार) सकाळी एका वेटरचा मृतदेह (murder) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशाल रामदास सदाफळे (वय ५०, रा. नशीबपुरा ता. अचलपूर जि. अमरावती, हल्ली मुक्काम, विद्यानगर, सेलू जि. परभणी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मृताची बहीण पूजा रामदास सदाफळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रपूर : दोन पट्टेदार वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विशाल परतूर (जि. जालना) तालुक्यातील सातोना खुर्द शिवारातील सेलू-परतूर रस्त्यावरील दुधना धाब्यावर वेटर म्हणून कामाला होता. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास विशाल यांचा मृतदेह सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात आढळला. याबाबत माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक अश्विनीकुमार, पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, सहायक पोलीस निरीक्षक चौरे, पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच परभणी येथून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.

अज्ञात आरोपीने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून सिमेंटच्या गट्टू व विटाने डोक्यात जबर मारहाण करून विशालला जीवे ठार  मारले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात खूनाचा (murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 murder : उपजिल्हा रूग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

उपजिल्हा रूग्णालयात मेस्को या कंपनी मार्फत चार सुरक्षा रक्षक भरती करण्यात आले होते. मात्र, कंपनीचा करार संपुष्टात आल्याने मागील तीन महिन्यापासून उपजिल्हा रूग्णालयात सुरक्षा रक्षक नसल्याने या ठिकाणी अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. तसेच उपजिल्हा रूग्णालयात दररोज शेकडो रूग्ण येतात. तसेच महिला रूग्ण बाळंतपणासाठी येतात, जर सुरक्षा रक्षक नसेल, तर या ठिकाणी महिला रूग्णासह, डॉक्टर, नर्सेस यांना सुद्धा टवाळखोरांच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. सध्या तरी रात्रीच्या वेळी उपजिल्हा रूग्णालय तळीरामाचा अड्डा बनला आहे. याकडे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचलंत का ?

पहा व्हिडिओ 

या मंदिराला आहे 500 वर्षांचा इतिहास

Back to top button