नाशिक : राष्ट्रवादीच्या आजपासून बैठकांवर बैठका ; छगन भुजबळ करणार मार्गदर्शन | पुढारी

नाशिक : राष्ट्रवादीच्या आजपासून बैठकांवर बैठका ; छगन भुजबळ करणार मार्गदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकावार आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात रविवारी (दि.30) चांदवड येथे पालकमंत्री छगन भुजबळ मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्हा दौर्‍यात गेल्या 25 जानेवारीला येवला तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक येवला येथे झाली. रविवारी (दि.30) चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाची बैठक दुपारी 1 वाजता चांदवडला जिल्हा बँकेच्या सभागृहात होणार आहे. सोमवार, दि. 31 जानेवारी रोजी मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक सकाळी 11 वाजता मालेगाव येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात होणार आहे. दुपारी 3 वाजता सटाणा येथील राधाई मंगल कार्यालयात बागलाण विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक होईल. बुधवार, दि.2 फेब्रुवारी रोजी लासलगाव येथे निफाड पूर्व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक होणार आहे.

आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी पक्षाने बैठकांचा धडाका सुरू केला असून, त्याचाच भाग म्हणून प्रत्यक्ष तालुकावार जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी सांगितले. बैठकांना स्थानिक नेते, आजी-माजी आमदार, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, जयदत्त होळकर, यशवंत शिरसाट, संदीप पवार, शैलेश सूर्यवंशी, भाऊसाहेब भवर, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, दिलीप आहेर आदींनी केले आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button