आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षिकेचा अटकेपार झेंडा ; टांझानियामधील माउंट किलीमांजारो शिखर केले सर | पुढारी

आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षिकेचा अटकेपार झेंडा ; टांझानियामधील माउंट किलीमांजारो शिखर केले सर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील भिलमाळ (त्र्यंबकेश्वर) येथील आश्रमशाळेत कार्यरत असणार्‍या प्राथमिक शिक्षिका अमृता भालेराव यांनी टांझानियामधील 19 हजार 340 फूट अर्थात 5 हजार 484 मीटर उंचीचे माउंट किलीमांजारो शिखर सर करत भारताचा तिरंगा फडकवला. विशेष म्हणजे यंदाचे वर्ष हे भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्याचे औचित्य साधून भालेराव यांनी दक्षिण आफ्रिका खंडास्थित जगातील सात उंच पर्वतांपैकी पाच क्रमांकाच्या माउंट किलीमांजारो शिखरावर ध्वजरोहण केले.

यंदाच्या प्रजासत्ताकदिनी अर्थात 26 जानेवारी 2022 रोजी हे शिखर सर करणार्‍या त्या महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एकमेव महिला आहेत. अभिमानाची बाब म्हणजे किलीमांजारो सर करणार्‍या आदिवासी विकास विभागातील त्या पहिल्या कर्मचारी तसेच शिक्षिका आहेत. यात विशेष बाब म्हणजे 360 एक्सप्लोररचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेसाठी त्या एकट्याच परदेशात गेल्या होत्या.

दरम्यान, गेल्या आठवड्यात भालेराव यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त हिरालाल सोनवणे, उपआयुक्त अविनाश चव्हाण, नाशिकचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, प्रकल्प अधिकारी विकास मीना आणि मुख्याध्यापक अहिरे यांच्या शुभेच्छा घेऊन किलीमांजारो सर करण्यासाठी रवाना झाल्या होत्या.

उणे 10 अंशांत चढाई
अमृता भालेराव यांनी प्रजासत्ताकदिनी किलीमांजारोच्या उहूरू पीक शिखरावर भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी 25 जानेवारीला रात्री 11 वाजता उणे 10 ते 15 तापमान असताना चढण्यास सुरुवात केली. किलीमांजारो येथील ध्वजरोहणानंतर त्यांनी सर्व महिलांना सकारात्मकतेने जगण्याचा संदेश दिला.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button