

Supriya Sule Breaks Silence on Ajit Pawar and NCP Unity: राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणाची गणितं चांगलीच गुंतागुंतीची झाली आहेत. 15 जानेवारीला 29 महापालिकांसाठी मतदान होत असलं, तरी अनेक ठिकाणी पारंपरिक युती आणि आघाड्या तुटलेल्या दिसत आहेत. महाविकास आघाडीतले पक्ष अनेक शहरांत एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत, तर सत्तेत असलेले काही पक्ष स्थानिक पातळीवर वेगळीच भूमिका घेताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन गट पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. याच चर्चेला हवा देणारं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांचा गट भाजपसोबत सत्तेत आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये चित्र वेगळं आहे. या दोन शहरांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचा गट थेट भाजपच्या विरोधात उभा राहिलेला दिसतो.
या सगळ्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी भाजपावर थेट टीका केली. “राज्यात सध्या जे सुरू आहे, ते याआधी कधीच पाहिलं नव्हतं,” असं म्हणत त्यांनी भाजपाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अजित पवारांवर एकीकडे आरोप करायचे आणि दुसरीकडे त्यांच्यासोबत सत्ता उपभोगायची, हा विरोधाभास भाजपाने आधी स्वतः तपासावा, असंही त्यांनी सांगितलं.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी अतिशय सावध भूमिका घेतली. अजित पवारांनी याबाबत नेमकं काय विधान केलं आहे, ते पूर्ण ऐकल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महापालिकांपुरतंच आम्ही एकत्र आहोत, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
या संपूर्ण चर्चेत त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला. “आमच्या कुटुंबात कधीही दुरावा नव्हता आणि तो नाही. कौटुंबिक संबंध जसे होते तसेच आहेत,” असं सांगत त्यांनी वैयक्तिक आणि राजकीय बाबी वेगळ्या असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, राजकीय मतभेद आधीही होते आणि आजही आहेत. पुढे ते कसे असतील, याबाबत वेगळ्या पातळीवर चर्चा होऊ शकते, असं सूचक विधानही त्यांनी केलं.