

मुंबई ः खासदार सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री होतील आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांकडून त्यासाठी धक्कातंत्र वापरले जाईल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांपुरती मर्यादित असलेली चर्चा थेट राष्ट्रीय राजकारणापर्यंत पोहोचली आहे.
महापालिका निवडणुकांमध्ये यंदा अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत असून राज्यात भाजप आणि शिवसेना अनेक महानगरपालिकांमध्ये थेट एकमेकांविरोधात उभ्या ठाकणार असल्याचे चित्र समोर आले आहे. दुसरीकडे, पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. आता आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीला स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे पुण्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.