

Pune BJP Shiv Sena Rift: पुण्यात भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शिवसेना आणि भाजप युतीबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान भाजप नेते नवनाथ बन यांनी शिवसेनेतील एका माजी आमदारावर जोरदार टीका केली. दुसरीकडे, शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही या वादात भूमिका मांडत पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
नवनाथ बन यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या पुण्यातील एका माजी आमदाराचा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला. संबंधित नेत्याने अनेक पक्ष बदलले, मात्र राजकीय कारकीर्द घडवता आली नाही, अशी टीका त्यांनी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी त्यांना नाकारले. इतकेच नव्हे, तर त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले, असा दावा बन यांनी केला.
'माझ्यामागे कमळ आहे, मात्र तुझ्यामागे १२ पक्ष होते. तरीही तुला राजकीय कारकीर्द घडवता आली नाही,' अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. कुटुंबातील व्यक्तीलाही निवडून आणता आले नाही, अशा व्यक्तींनी भाजपला शहाणपण शिकवू नये, असेही ते म्हणाले. भविष्यात संबंधित नेत्याची निवडणूक चिन्ह म्हणून शिट्टी असेल, असा टोमणाही त्यांनी रवींद्र धंगेकरांना मारला आहे.
नवनाथ बन पुढे म्हणाले की, निलेश राणे हे आपले जवळचे मित्र आहेत. आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कोणतेही अपशब्द वापरलेले नाहीत आणि त्यांच्यावर टीकाही केलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
मात्र, शिवसेनेचे काही नेते आणि पदाधिकारी भाजपविरोधात भूमिका घेत असतील, तर त्याबाबत पक्षाने स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, अशी मागणी नवनाथ बन यांनी केली. रवींद्र धंगेकर आणि अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यांबाबत शिवसेनेने उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले.
पदवीधर उमेदवार स्मिता जाधव यांना पराभूत करण्यासाठी रवींद्र धंगेकर यांनी प्रयत्न केल्याचा आरोपही नवनाथ बन यांनी केला. तसेच सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात घेतलेल्या भूमिकेचे शिवसेना समर्थन करते का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
'मी एकनाथ शिंदे यांना जाब विचारलेला नाही. केवळ काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत राहावे, हाच आमचा प्रयत्न आहे. मात्र, पक्षातील काही छोटे पदाधिकारी महायुतीमध्ये दरी निर्माण करत असतील, तर त्यांच्यावर कारवाई होणार का?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भाजपच्या विरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांबाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नवनाथ बन यांनी केली. पक्षाचे पदाधिकारी सोशल मीडियावर पोस्ट करत असताना ती पक्षाची अधिकृत भूमिका आहे का, हे स्पष्ट होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजप बंडखोरांवर प्रदेशाध्यक्षांनी सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली होती. अमरावतीमध्येही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. मग पुण्यात भाजपविरोधात काम करणाऱ्या रवींद्र धंगेकर किंवा सत्तार यांच्यावर शिवसेना कारवाई करणार आहे का, असा सवाल नवनाथ बन यांनी केला. 'काही झारीतले शुक्राचार्य महायुतीमध्ये वाद निर्माण करत आहेत. तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे,' असेही ते म्हणाले.
धंगेकर ज्या भाषेत बोलतात, त्याच भाषेत त्यांना उत्तर दिले जात असल्याचे नवनाथ बन यांनी स्पष्ट केले. मात्र, एकेरी उल्लेख करणे हे आपले संस्कार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
'मी कोणाच्याही वाकड्यात शिरलेलो नाही. धंगेकर यांनी माझ्याबद्दल ज्या पद्धतीने वक्तव्य केले, त्याला उत्तर दिले आहे. भाजपविरोधात काम करणाऱ्यांबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे, हा माझा साधा प्रश्न आहे,' असे नवनाथ बन म्हणाले.
पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे गटावरही जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचे जनतेने दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.
नागपूरमधील निवडणुकीच्या निकालावर बोलताना भाजपला पहिल्या क्रमांकाची मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दोन जागा हातातून गेल्या असल्या, तरी त्यात विरोधकांचे कर्तृत्व नसून आम्ही स्वतःचे आत्मपरीक्षण करत आहोत, असे ते म्हणाले. 'दुसऱ्याच्या घरात मूल जन्माला आले म्हणून उबाठाने पेढे वाटू नयेत,' अशा शब्दांत त्यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केले.