जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जामनेर तालुक्यातील पाचोरा रस्त्याकडे जाणाऱ्या टाकळी गावाजवळ नागदेवता मंदिर परिसरात अज्ञात वाहनाने कट मारल्याने कार थेट नाल्यात कोसळली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. आज सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कारमधील इतर दोघेजण गंभीरअसून सुदैवाने एक वर्षाचा मुलगा बचावला. पकंज गोविंदा सैंदाणे (वय-२५, रा. तुकाराम नगर, भुसावळ), सुजाता प्रवीण हिवरे (वय-३०, रा. त्रिमुर्ती नगर, भुसावळ) आणि प्रतिभा जगदीश सैंदाणे अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ येथील सुजाता हिवरे , हर्षा पंकज सैंदाणे, नेहा राजेश अग्रवाल, प्रतिभा सैंदाणे आणि स्पंदन सैंदाणे (वय-१) हे लग्नकार्याच्या निमित्ताने कार क्र. (एम एच १८ डब्ल्यू २४१२) ने पाचोराच्या दिशेने निघाले होते. पकंज कार चालवत होते. कार पहूर -जामनेर रस्त्यावर असलेल्या नागदेवता मंदिराजवळ आली. यावेळी औरंगाबादकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारल्याने कारचालक पंकज याचा कारवरील ताबा सुटला. कार थेट बाजूच्या नाल्यात कोसळली. यात कार चालक पंकज सैंदाणे आणि सुजाता हिवरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर हर्षा सैंदाणे, नेहा अग्रवाल, प्रतिभा सैंदाणे गंभीररित्या जखमी झाले. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान प्रतिभा यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत १ वर्षाचे स्पंदन सैंदाणे हे बालक बचावले आहे.
अपघातास कारणीभूत ठरलेला वाहन चालक पसार झाला असून पाेलिस त्याचा शाेध घेत आहेत. दरम्यान, जामनेर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या रिक्षा आणि ट्रकच्या अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. अवघ्या दोन दिवसांतच हा अपघात झाल्याने जामनेरसह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
हेही वाचलं का?