नाशिक : देवळा येथील कांद्याचा लिलाव पूर्ववत सुरू, २८५० रुपये भाव - पुढारी

नाशिक : देवळा येथील कांद्याचा लिलाव पूर्ववत सुरू, २८५० रुपये भाव

देवळा; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसामुळे देवळा बाजार समितीच्या परिसरात बुधवारी रोजी कांद्याचा लिलाव झाला नाही. मात्र, गुरुवारी (दि. २) रोजी पावसाने उघडीप दिल्याने सकाळच्या सत्रात कांद्याचा लिलाव पूर्ववत सुरू होऊन उन्हाळ कांद्याला २८५० रुपये भाव मिळाला.

देवळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊसामुळे कांदा व द्राक्ष तसेच कांदा रोपांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी अवकाळी पावसामुळे देवळा बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आलेल्या लाल व उन्हाळ कांद्याचे लिलाव होऊ शकले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला होता. यावेळी मार्केटमधून काही वाहने परत गेली होती.

यानंतर मात्र, पावसाच्या विश्रांतीनंतर आज गुरुवारी (दि. २) सकाळपासून कांद्याचा लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आला. सकाळच्या सत्रात आलेल्या उन्हाळ कांद्याला २८५० रुपये तर लाल कांद्याला २००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

अवकाळी पावसामुळे लाल कांद्याचे नुकसान झाले असून, यामुळे बाजारात उन्हाळ कांद्याला मागणी वाढणार असल्याने भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांमध्ये यामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button