धुळे व नंदुरबार जिल्हा बँक : दहा जागांसाठी चुरशीने 97. 36 टक्के मतदान | पुढारी

धुळे व नंदुरबार जिल्हा बँक : दहा जागांसाठी चुरशीने 97. 36 टक्के मतदान

धुळे ; पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्हा बँकेच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. माघार अखेर 7 जागा बिनविरोध झाल्या. तर उर्वरित दहा जागा बिनविरोध करण्यासाठीचे प्रयत्न अपयशी ठरल्याने जिल्हा बँकेच्या दहा जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. यात बँकेच्या 983 पैकी 957 सदस्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

यात धुळे तालुक्यातून 97 टक्के, साक्री तालुक्यातून 97 तर शिरपूर तालुक्यातून 96. 88 टक्के मतदान झाले. शिंदखेडा तालुक्यातून 86. 67, नंदुरबार तालुक्यातून 98. 81, शहादा तालुक्यातून 94. 74, नवापुर तालुक्यातील 100 टक्के मतदान झाले आहे. तळोदा तालुक्यातून 86. 33 टक्के, अक्कलकुवा तालुक्यातून शंभर टक्के आणि अक्रनिमहाल येथून देखील शंभर टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे.

धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या 10 जागांसाठी सकाळी मतदान सुरू झाले. या निवडणुकीत 3 माजी आमदार आपले नशीब आजमावत आहेत. धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय शेतकरी पॅनल तयार करून प्रयत्न सुरू करण्यात आले.

बँकेचे मावळते चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह आमदार अमरिशभाई पटेल यांनी या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या बैठकांचे सत्र सुरू केले. त्यावरून माघारी अंती बँकेची निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता होती;  पण माघारीच्या दिवशी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्नांना यश  आले नाही. या बँकेच्या 9 मतदार संघाच्या 10 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत.

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपबरोबर जाणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळेच सामोपचाराच्या बैठकांना शिवसेनेने दांडी मारली. परिणामी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसले. यापूर्वी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. यात सर्व पक्षीय शेतकरी विकास पॅनलच्या 6 जागा असून एका जागेवर शिवसेनेला यश आले आहे.

बिनविरोध उमेदवारांमध्ये भगवान विनायक पाटील, प्रभाकर तुकाराम चव्हाण, दीपक पुरुषोत्तम पाटील, आमशा फुलजी पाडवी, भरत बबनराव माळी, शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक व शामकांत रघुनाथ सनेर यांचा समावेश आहे. उर्वरित नऊ मतदार संघाच्या दहा जागांसाठी आता वीस उमेदवार रिंगणात आहेत.

यात कृषी पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया संस्थेच्या मतदारसंघातून मावळते चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे रिंगणात असून, नंदुरबारचे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना नंदुरबार तालुक्यातून प्राथमिक कृषी पतसंस्था विकास मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहे. तर माजी आमदार शरद पाटील हे देखील नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी आज 983 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button