ShivSena vs BJP : संजय राऊत-देवेंद्र फडणवीसांची नाशिकच्या कार्यक्रमात गळाभेट! | पुढारी

ShivSena vs BJP : संजय राऊत-देवेंद्र फडणवीसांची नाशिकच्या कार्यक्रमात गळाभेट!

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : ShivSena vs BJP : युतीचा विस्कोट झाल्यापासून शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी कधी सोडत नाही. त्याचा प्रत्यय नाशिक येथेही आला. आधी एकमेकांवर तुफान आरोप प्रत्यारोप करून झाल्यानंतर शिवसेना भाजपचे तीन नेते एका विवाह सोहळ्यात मात्र गप्पागोष्टींमध्ये रंगल्याचे चित्र दिसून आले. आणि हे सर्व घडले ते नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरच!

नाशिक येथे शनिवारी (दि. २०) एका विवाह सोहळ्यासह विविध विकास कामांच्या उद‌्घाटन सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते संजय राऊत आले होते. विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वी खासदार राऊत यांनी कृषी कायद्यांसंदर्भात केंद्र सरकारवर आगपाखड केली. महाराष्ट्राला दोन वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले आणि आजची पहाट म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची स्वातंत्र्य पहाट असल्याची टीका राऊतांनी केली. तसेच चंद्रकांत पाटील यांना कृषी कायदे रद्द झाले म्हणून दु:ख झाल्याने शोकसंदेश पाठवू, अशा प्रकारचा टोला राऊत यांनी लगावला होता. त्यावर पाटील यांनीही राऊतांचे डोके चेक करावे लागणार असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. तर फडणवीस यांनी राऊत यांचा अहंकार झळकत असून, कृषी कायद्यांबाबत सरकारवर टीका करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असा प्रश्न उपस्थित केला. ShivSena vs BJP

शिवसेना-भाजपच्या नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा संपत नाही तोच हे तिन्ही नेते एका विवाह सोहळ्यामध्ये मात्र गप्पागोष्टी आणि हसीमजाक करताना दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. विशेष म्हणजे पाटील आणि राऊत यांनी एकत्रितच बैठक मांडत एकमेकांना टाळ्या देताना दिसल्याने बाहेर एकमेकांवर आरोप करणारे हे तेच नेते का, असा प्रश्न बघ्यांना पडला असावा. दोन नेत्यांमध्ये नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे बसलेले होते. यामुळे त्यांनीही आरोप प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांच्या गप्पागोष्टींचा आस्वाद घेतला.

Back to top button