Dhule Legislative Council : अमरिश पटेल यांनाच भाजपकडून उमेदवारी, महाविकास आघाडीसमोर पुन्हा मोठे आव्हान | पुढारी

Dhule Legislative Council : अमरिश पटेल यांनाच भाजपकडून उमेदवारी, महाविकास आघाडीसमोर पुन्हा मोठे आव्हान

धुळे : यशवंत हरणे

धुळे विधान परिषद निवडणुकीसाठी (Dhule Legislative Council election) भारतीय जनता पार्टीने आमदार अमरिश पटेल यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. शिरपूर मतदारसंघातून सलग सहा वेळा या मतदार संघातून काँग्रेसच्या माध्यमातून व दोन वेळेस विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करणारे पटेल यांची उमेदवारी महाविकास आघाडीची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. या विधान परिषद मतदारसंघासाठी गेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडे त्यांच्याकडे असलेल्या मतदानापेक्षा जास्तीची मते मिळवून अमरीश पटेल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला होता. महाविकास आघाडीला त्यांच्याकडे असलेले संख्याबळदेखील राखता आले नव्हते. ही बाब आघाडीसाठी चिंतेची बाब ठरणार आहे.

धुळे– नंदुरबार विधान परीषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. या जागेवर भारतीय जनता पार्टीने आमदार अमरीश पटेल यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात आ. पटेल यांचा मोठा दबदबा राहिला आहे. शिरपूर मतदार संघात 1990 पासून काँग्रेसच्या माध्यमातून विधानसभेत प्रतिनिधित्व करत असताना पटेल यांना राज्यात शिक्षण मंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. तर हा मतदारसंघ राखीव झाल्यावर त्याच्या पाठिंब्यावर कांशीराम पावरा हे आमदार झाले. तर पटेल हे विधान परिषदेवर गेले. पण 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पटेल यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने आमदारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले.

या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार अभिजीत पाटील यांचा  दारुण पराभव केला होता. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातून 437 मतदार होते. यात धुळे जिल्ह्यातून 237 तर नंदुरबार जिल्ह्यात 200 मतदार होते. प्रत्यक्षात 334 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यातून भाजपकडे 204 मत असताना पटेल यांनी तब्बल 332 मते मिळवली. तर महाविकास आघाडीचे पाटील यांना अवघी 98 मते मिळवली. प्रत्यक्षात काँग्रेसकडे 156, राष्ट्रवादीकडे 34 आणि शिवसेनेकडे 20 मतदान असताना महाविकास आघाडीच्या पाटील यांना त्यांच्याच पक्षाची पुर्ण मते मिळाली नसल्याने महाविकास आघाडीच्या सदस्यांनीदेखील आमदार अमरीश पटेल यांनाच साथ दिल्याचे दिसून आले.

महाविकास आघाडीसमोर पुन्हा मोठे आव्हान…

या निवडणुकीत राज्याचे मंत्री के. सी. पाडवी, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील व शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिष्ठा पणाला लागली. या नेत्यांना त्यांच्याच पक्षाची मते राखण्यात अपयश आल्याने आ. पटेल यांना विजयासाठी पहिल्या पसंतीसाठी 219 मते आवश्यक असताना त्यांना 334 मते मिळाली. या पराभवात महाविकास आघाडीच्या उमेदवारास मतदान न करणाऱ्या सदस्यांना काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एक प्रकारे अभयच दिले. आ. पटेल हे काँग्रेसमध्ये असताना त्यांचा यादोन्ही जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सदस्यांबरोबर असलेल्या संपर्कामुळे त्यांना मतदान मिळाल्याचे सांगून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी टाळले होते. आता याच मतदारसंघाची निवडणूक पुन्हा लागल्याने राजकीय धुराळ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीत भाजपच्यावतीने पुन्हा अमरीश पटेल यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर पुन्हा विजयासाठी मोठे आव्हान उभे राहणार आहे.

Dhule Legislative Council election : महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये ऑलवेल नाही?…

महाविकास आघाडीकडून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून उमेदवार येण्याची शक्यता बोलली जाते आहे. सध्या धुळे जिल्ह्यातील साक्री व नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव नगरपरिषदेवर प्रशासक असल्याने या दोन्ही तालुक्यातून मतदान होणार नाही. तर या निवडणुकीत 399 मतदार आहेत. यात भाजपकडे 199, काँग्रेसकडे136, राष्ट्रवादीकडे 20, शिवसेनेकडे 20, एमआयएमकडे 9, समाजवादी पक्षाचे 4, अपक्ष 9, तर बसपा व मनसेकडे प्रत्येकी एक मत आहे. मतांची ही गोळाबेरीज पहाता भाजपकडे संख्याबळ जास्त असले तरीही धुळे मनपामध्ये भाजपच्या नगरसेवकांमधील मतभेद पहाता त्यांना आपलेच मत सांभाळण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहे. दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीच्या दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांमध्येदेखील ऑलवेल नसल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समझोता घडला नसल्याने बँकेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला त्यांच्या उमेदवारावर एकमत करुन मतदारांमध्ये आत्मविश्वास जागवावा लागणार आहे. अन्यथा पोटनिवडणुकीत झालेला अध्याय पुन्हा घडल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भाऊंमुळेच ‘लालपरी’ रस्त्यांवरून धावते !!!

Back to top button