जळगाव जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडीचा तिढा सुटता सुटेना | पुढारी

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडीचा तिढा सुटता सुटेना

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्हा बँक निवडणूक : जिल्हा बँक निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून आघाड्यांचा तिढा सुटण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीये. पूर्वी सर्वपक्षीय आघाडी होणार म्हणून सर्व पक्षांनी कोर कमिटी बनवली मात्र काँग्रेसने भाजपबरोबर जाण्यास नकार दिला. त्यामुळे सर्वपक्षीय आघाडी न होता सर्व पक्षांनी अर्ज भरले. महाविकास आघाडी होणार म्हणून बैठका झाल्या. मात्र चोपड्याच्या जागेवरून अजूनही वाद सुरू असल्याने तोही तिढा सुटला नाही. दरम्यान, आज सोमवार (दि. ७) दुपारी माघारीची मुदत असल्याने माघारी नंतरच चित्र स्पष्ट होणार का असेच चित्र दिसू लागले आहेत.

संसर्ग प्रादूर्भावामुळे तब्ब्ल तीन ते चार वेळा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला मुदत वाढ देण्यात आली होती. दीड वर्ष लांबणीवर पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणूकांचा कार्यक्रम सहकार विभागाकडून जाहीर झाला होता. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ४१५ अर्जांपैकी इच्छुकांकडून २७९ अर्ज दाखल करण्यात आले. या अर्जांपैकी छाननी अंती १३० अर्ज अवैध असून २१ जागांसाठी १४९ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी आज (दि. ७) माघारीचा अंतिम दिवस असून किती उमेदवार निवडणूक रंगणात असतील हे सोमवारी दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल. त्यातच शनिवारी सायंकाळी महाविकास आघाडीची बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरल्यानंतर मविआतील एका गटाचे सदस्य सहलीला देखील रवाना झाल्याचे वृत्त आहे. एरवी बिनविरोध वा फारसा गाजावाजा न होणारी जिल्हा बँकेची निवडणूक यावर्षी मात्र ऐनवेळी काँग्रेसने स्वबळाचा नारा देत सर्वपक्षीय पॅनलमधून बाहेर पडल्याने अटीतटीची बनली आहे. त्यामुळे राजकिय धुरीणांसह सर्वसामान्यामध्ये अनेक तर्कवितर्क लढविल जात आहेत.

जिल्हा बँकेच्या २१ सदस्य संचालकांच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासह भाजपा व अन्य गटाची सर्वपक्षीय बैठक अजिंठा विश्रागृह येथे पार पडल्यानंतर सर्वपक्षीय पॅनलमध्ये भाजपा असून यात विचारांशी तडजोड करणार नाही असे म्हणून काँग्रेस बाहेर पडल्याने जिल्हा बँकेच्या निवडणूकी वेगळीच कलाटणी मिळाली.

दरम्यान निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भाजपाला गाफिल ठेवल्यानंतर भाजपाकडून देखिल २१ जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. छाननी अंती भाजपाच्या मातब्बर उमेदवारांच्या अवैध अर्ज प्रकरणी ९ जणांनी अपिल अर्ज दाखल केले. यापेकी कामगार विकास आघाडीच्या गटातील सदस्यांचा केवळ १ अर्ज वैध ठरविण्यात येउन अन्य ८ अर्जदारांचे अपिल फेटाळण्यात आले. यात मुक्ताईनगर मतदार संघातील नाना पाटील यांनी हायकोर्टात धाव घेवूनही त्यांचा देखिल अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे मुक्ताईनगर मतदार संघातून माजी मंत्री तथा बँकेचे सर्वेसर्वा एकनाथराव खडसे यांचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे.

माघारीअंतीच चित्र स्पष्ट होणार

जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीय पॅनलऐवजी आता महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा अशीच लढत असून मविआची बैठक ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी अजिंठा विश्रामगृह येथे पार पडली. पुन्हा जागावाटपाचे सूत्र ठरले असून सर्वात जास्त ११ जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना ७ व काँग्रेस ३ विरूद्ध भाजपा अशी लढत आहे. काँग्रेसला तीन जागा देण्याचे निश्‍चित झाले असले तरी कॉंग्रेसला धरणगाव महिला राखीव उमेदवारासाठी अजून एक जागेची मागणी कायम आहे. तर अमळनेर मधील एक जागा शिवसेना असली तरी या  तिलोत्तमा पाटील यांच्यासाठी अमळनेरमधून राष्ट्रवादी काँग्रेस अडून आहे. त्यामुळे त्या जागेचा तिढा अजून सुटलेला नाही.

अमळनेर पारोळा एरंडोल यासह मुक्ताईनगर या ठिकाणच्या प्रत्येकी एक जागा बिनविरोध आल्यासारख्याच आहेत. परंतु अन्य सोसायटी, स्थानिक स्तर व अन्य मतदार संघातील जागांवर तगडे उमेदवार असून जळगाव मधून आ. सुरेश भोळे यांना शह देण्यासाठी मविआच्या बैठकीनंतर लगेचच ४० ते ४५ जणांचा जथ्थाच सहलीवर रवाना देखील झाला असल्याचे आतल्या गोटाचे वृत्त आहे.

काँग्रेसला हव्यात चार जागा

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सुरूवातीपासूनच चार जागांची मागणी होती. यात ३ जागा सोसायटी मतदार संघ व १ जागा महिला राखीव असे ठरले होते. ती मागणी मान्य देखिल केली होती. परंतु ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस देखील तीच जागा हवी म्हणून अडून बसली आहे. काँग्रेसतर्फे १८ उमेदवारी अर्ज दाखल असून अजून माघारीसाठी आज दुपारपर्यंत वेळ आहे. तिढा हा सुटण्यासाठीच असून या सर्वच जागा निवडून येणार हा विश्वास आहे.

प्रदिप पवार, जिल्हाध्यक्ष भारतीय काँग्रेस

Back to top button