मुंबई-नाशिक महामार्गावर कोंबड्यांच्या टेम्पोचा अपघात; दोन तरुण जागीच ठार - पुढारी

मुंबई-नाशिक महामार्गावर कोंबड्यांच्या टेम्पोचा अपघात; दोन तरुण जागीच ठार

ठाणे; पुढारी वृत्तसेवा

कोंबड्यानी भरलेल्या टेम्पोचा मुंबई-नाशिक महामार्गावर ठाणे, खारेगाव जवळ आज (रविवार) सकाळी सुमारे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पो चालक सलमान खान (वय ३४) याच्यासह क्लिनर फिरोज खान (३२) हे जागीच ठार झाले.  या अपघातामुळे या महामार्गावरील ठाण्याकडे येणारी वाहतूक पाऊण तास खोळंबली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर जवळपास एक तासांनी वाहतूक सुरळीत झाली.

कोंबड्यांनी भरलेला टेम्पो घेऊन नाशिकहून ठाण्यात येत होता. याचदरम्यान ठाण्यातील खारेगावजवळ तो टेम्पो पुढे असणाऱ्या कंटेनरला जाऊन जोरात धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, टेम्पो चालकासह क्लिनर जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, कळवा पोलिस अधिकारी, कळवा वाहतूक पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दल यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

अपघातामुळे गाडीतील तेल रस्त्यावर सांडले होते. वाहनांचे अपघात टाळण्यासाठी रस्ता पाण्याने धुण्यात आला. या अपघातामुळे ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक खोळंबली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास एक तासांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आली. त्यानंतर ठाण्याकडे येणारी वाहतूक सुरळीत झाली. यावेळी एक दोन क्यूआरव्ही, एक क्रेन आणि हायड्रा वाहन पाचारण करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

हेही वाचलं का?

Back to top button