नाशिक : ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी शिवभक्तांची मांदियाळी | पुढारी

नाशिक : ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी शिवभक्तांची मांदियाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आणि तिसर्‍या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी राज्यासह परराज्यातील शिवभक्तांची मोठी गर्दी त्र्यंबकेश्वर होत असते. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने अडीचशे जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. जुने सीबीएस बसस्थानकातून जादा बसेस सुटणार असल्याने रविवारी (दि.३) परिसरात भाविकांची मांदियाळी होती. सायंकाळनंतर त्र्यंबकेश्वरला जाणार्‍या शिवभक्तांचा ओघ वाढल्याचे दिसून आले.

श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. प्रदक्षिणा पूर्ण केल्याने पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा शिवभक्तांमध्ये आहे. याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांची त्र्यंबकेश्वरमध्ये झुंबड उडते. भाविकांच्या गर्दीच्या दृष्टीने खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरला मनाई केली आहे. प्रदक्षिणेच्या दीड दिवस महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात येतात. तिसर्‍या श्रवण सोमवारीच्या जादा वाहतुकीसाठी चालक-वाहकांसह इतर कर्मचार्‍यांच्या विशेष ड्युट्या लावलेल्या आहेत. जुने बसस्थानकासह इतर ठिकाणीही अतिरिक्त कर्मचार्‍यांची नियुक्ती केलेली आहे. जुने सीबीएसहून त्र्यंबकेश्वरसाठी १८० जादा बसेस धावत आहेत. तसेच आंबोली, पहिने आणि घोटी येथून प्रत्येकी १०, तर खंबाळे येथून ४० जादा बसेसचे नियोजन केले आहे.

सोमवारी (दि. ४) ब्रह्मगिरीची परिक्रमा पूर्ण केल्यानंतर भाविकांना परतीचे वेध लागतात. त्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठीही महामंडळाच्या बस सज्ज राहणार असल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले. त्यामुळे शिवभक्तांचा परतीचा प्रवासही सुकर होणार आहे. दरम्यान, सिटीलिंककडून त्र्यंबकेश्वर मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. निमाणी, सातपूर आणि नाशिकरोड बसस्थानकातून सिटीलिंकच्या बसेस आहेत.

‘बम बम भाेले’चा गजर

ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या पूर्वसंध्येला जुने बसस्थानकातून भाविक एसटी महामंडळाच्या बसेसद्वारे त्र्यंबकेश्वरला रवाना झाले. ‘हर हर महादेव’, ‘जय भोले’, ‘बम बम भोले’च्या गजरात शिवभक्तांकडून केला जात होता. त्यामुळे संपूर्ण परिसर महादेवाच्या गजराने दुमदुमून गेला होता.

हेही वाचा :

Back to top button