कोल्हापूर : ‘सकल मराठा’चे आज ‘जवाब दो’ आंदोलन | पुढारी

कोल्हापूर : ‘सकल मराठा’चे आज ‘जवाब दो’ आंदोलन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणार्‍यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (दि. 4) सरकारला जाब विचारला जाणार आहे. दसरा चौकात सकाळी साडेअकरा वाजता ‘जवाब दो’ आंदोलन होणार आहे. लोकशाही आणि संपूर्ण शांततेत निषेध व्यक्त केला जाणार असल्याचे सकल मराठा समाजाचे अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी सांगितले.

मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. कोल्हापूर दौर्‍यावर येणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घेऊनच कोल्हापुरात यावे, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा देत सोमवारी दसरा चौकात ‘जवाब दो’ आंदोलन केले जाणार आहे.

सकाळी साडेअकरा वाजता आंदोलनाला प्रारंभ होईल. संपूर्ण शांततेच्या मार्गाने सरकारचा निषेध करत, मराठा आरक्षणप्रश्नी जाबही विचारला जाणार आहे. या आंदोलनात शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक उपस्थित राहणार आहेत. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपले पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवून, मराठा समाज म्हणून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांना देणार निषेध पत्र

दरम्यान, सोमवारी सकाळी कोल्हापूर दौर्‍यावर येत असलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांना राज्य शासनाचा निषेध करत असल्याबद्दलचे निषेध पत्र सकल मराठा समाजाच्या वतीने दिले जाणार आहे. याकरीता पालकमंत्री केसरकर यांच्याकडे भेटीची वेळ मागितली असल्याचे सकल मराठा समाजाचे दिलीप देसाई यांनी सांगितले.

Back to top button