नाशिकला पुढारी न्यूज चॅनलचे जल्लोषात स्वागत | पुढारी

नाशिकला पुढारी न्यूज चॅनलचे जल्लोषात स्वागत

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

जनसामान्यांचा आवाज बनलेल्या आणि अखंड ८५ वर्षांची परंपरा लाभलेल्या दैनिक ‘पुढारी’ वृत्तसमूहाच्या पुढारी टीव्ही न्यूज चॅनलचे प्रक्षेपण सुरू होताच मंगळवारी(दि.२९) नाशकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. दैनिक पुढारीच्या नाशिक कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सर्व स्तरातील मान्यवरांनी पुढारी न्यूज चॅनलवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

नि:पक्ष, निर्भीड, सडेतोड व आक्रमक पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या दैनिक पुढारीच्या टीव्ही न्यूज चॅनलची गेल्या अनेक दिवसांपासून जनसामान्यांना प्रतीक्षा होती. सकाळी दहाच्या सुमारास पुढारी टीव्ही न्यूज चॅनलचे धडाक्यात प्रक्षेपण सुरू होताच जनसामान्यांमधून सकारात्मक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. प्रस्थापित व्यवस्थेने दबलेला जनसामान्यांचा आवाज बनत पुढारी न्यूज चॅनलच्या हायलाइटस‌् एकेक करून टीव्ही स्क्रीनवर येऊ लागल्या अन‌् या चॅनलप्रती असलेल्या जनतेच्या अपेक्षांच्या परिपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. चॅनलची सुटसुटीत मांडणी लक्षवेधी ठरली. ‘आपला चॅनल पुढारी न्यूज चॅनल’ अशा प्रतिक्रिया उमटल्या. चॅनलवरील बातम्यांचे सर्व स्तरांतून कौतुक केले गेले. विशेषत: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दुष्काळाचे भीषण वास्तव दाखविणारी बातमी मनाचा ठाव घेणारी ठरली.

सायंकाळी ‘सरकार पुढारी न्यूजवर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एकत्रित मुलाखत प्रथमच टीव्हीवर सादर झाली. राजकीय क्षेत्रातील अभ्यासकांकडून या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले. त्यानंतर रात्री आठ वाजता ‘महाराष्ट्राचा महापोल’ या कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल तब्बल ६० हजार व्यक्तींच्या सर्वेक्षणाचा निष्कर्षात्मक आढावा घेण्यात आला तसेच राजकीय मतेही जाणून घेण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button