‘पुढारी न्यूज’ चॅनलचे राज्यभर जल्लोषी स्वागत

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘पुढारी न्यूज’ चॅनलचे मंगळवारी राज्यभरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, मिठाईचे वाटप करण्यात आले. अनेक लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, विचारवंत, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘पुढारी’च्या या नवीन वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.
85 वर्षांची परंपरा लाभलेल्या ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाच्या ‘पुढारी न्यूज’ टीव्ही चॅनलचा मंगळवार, 29 ऑगस्ट रोजी दिमाखात प्रारंभ झाला. नवी दिल्ली, संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह देशातील प्रमुख ठिकाणी या नव्या चॅनलचे मोठे नेटवर्क आहे.
सांगली : जिल्ह्यात चॅनलचे जोरदार स्वागत करण्यात आले. सांगली, मिरज शहरात अनेक सामाजिक कार्यकर्त्यार्ंनी आनंद व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. आमदार सुधीर गाडगीळ, बाजार समिती व जिल्हा बँकेतील अधिकारी, पदाधिकारी यांनी उत्सुकतेने चॅनल पाहिले. मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘पुढारी’च्या नवीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नाशिक : ‘पुढारी न्यूज’ टीव्ही चॅनलचे प्रक्षेपण सुरू होताच नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर्व स्तरांतील मान्यवरांनी चॅनलवर शुभेच्छांचा वर्षाव केला. नि:पक्ष, निर्भीड, सडेतोड व आक्रमक पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणार्या दै. ‘पुढारी’च्या न्यूज चॅनलची गेल्या अनेक दिवसांपासून जनसामान्यांना प्रतीक्षा होती. सकाळी दहाच्या सुमारास ‘पुढारी न्यूज’ टी.व्ही. चॅनलचे धडाक्यात प्रक्षेपण सुरू होताच जनसामान्यांमधून जोरदार स्वागत करण्यात आले. चॅनलच्या सुटसुटीत मांडणीचे प्रेक्षकांनी कौतुक केले.
छत्रपती संभाजीनगर : ‘पुढारी न्यूज’चे छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ‘पुढारी’च्या वाचकांनी प्रत्यक्ष भेटून, व्हॉटस्अॅप, सोशल मीडियातून चॅनलला शुभेच्छा दिल्या.
पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील टिळक चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी करीत विविध राजकीय पक्षांच्या आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी ‘पुढारी न्यूज’ला शुभेच्छा दिल्या. जनतेचे प्रश्न या वाहिनीवरून खर्या अर्थाने मांडले जातील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
अनेक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या फलकावर ‘पुढारी न्यूज’ला शुभेच्छा देणारे संदेश झळकवले आहेत. काही मंडळांनी रांगोळ्याची सजावट केली होती.
सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्गनगरी येथे खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ‘पुढारी न्यूज’ टी.व्ही. चॅनलच्या शुभारंभाचा जल्लोष करण्यात आला. ‘पुढारी’चे स्वतंत्र न्यूज चॅनल सर्वसामान्यांचा आवाज बनेल, असा विश्वास खा. विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर फटाके वाजवून आणि पेढे वाटून या चॅनलचे स्वागत करण्यात आले.