नाशिक क्राईम : तडीपार असतानाही शहरात मोबाइल चोरी, पोलिसांनी दोघांना पकडलं  | पुढारी

नाशिक क्राईम : तडीपार असतानाही शहरात मोबाइल चोरी, पोलिसांनी दोघांना पकडलं 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातून तडीपार केलेले असतानाही एकाने साथिदारासोबत मिळून शहरात मोबाइल चाेरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पांडुरंग उर्फ पांड्या हनुमंत शिंगाडे (१९, रा. पंचशिल नगर, गंजमाळ) व गणेश शाम जाधव (२१, रा. म्हसोबा वाडी, गंजमाळ) यांना पकडले आहे. पांडुरंग शिंगाडे हा तडीपार असल्याचे पोलिस तपासात समोर आले.

गुन्हे शाखेतील पोलिस नाइक विशाल काठे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार शालिमार परिसरात चोरीचे मोबाइल विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले हाेते. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार नाजिम पठाण, नाईक विशाल देवरे, विशाल काठे, अंमलदार राजेश राठोड यांच्या पथकाने शालिमार परिसरात सापळा रचला. दोघांनाही पकडून झडती घेतली असता त्यांच्याकडे ९० हजार रुपयांचे मोबाइल व गुन्ह्यांमध्ये वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. या दोघांनाही म्हसरुळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शिंगाडे हा तडीपार होता. मात्र तरीदेखील तो विनापरवानगी शहरात वास्तव्य करीत गुन्हे करत असल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा :

Back to top button