

हुपरी, कोल्हापुरातील आर. के. नगर येथील चोरीचा छडा लावण्यास हुपरी पोलिसांना यश आले आहे. एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोने, मोटरसायकलीसह पावणे अकरा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली. चोरट्यांनी चोरीचे सोने विकून त्या पैशातून यामाहा मोटरसायकल खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या चोरी प्रकरणात ढेरे दाम्पत्याचा समावेश आहे.
प्रविण बाबुराव जाधव (वय 30, रा. अंबाईनगर, रेंदाळ, ता. हातकणंगले), संदीप रामचंद्र ढेरे (वय 25, रा. आर. के. नगर, मूळ इस्पुर्ली, ता. करवीर), सरिता संदीप ढेरे (वय 23, रा. आर. के. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, आर. के. नगर येथील अमर अनंतराव वायचळ यांच्या घरी चोरी झाली होती. तेथून १२ लाख किमतीचे २४ तोळे सोने लंपास केले होते. यात अंगठी, हार, झुबे, बाजू बंद, पाटल्या, कर्ण फुले आदी दागिन्यांचा समावेश होता. यातील संशयित आरोपी सरिता हीने वायचळ यांच्या घरातील सोने चोरून पती संदिप व प्रवीण यांच्याकडे दिले होते. या दोघांनी यातील काही सोने हुपरीत विकले होते. मिळालेल्या पैशांतून त्यांनी (एमएच 09 एन 3517) यामाहा मोटरसायकल खरेदी केली होती. तर ४ लाखांचे सोने एका बँकेत तारण ठेवले आहेत.
चोरीचे दागिने हुपरी येथे विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर उपनिरीक्षक गणेश खराडे, चालक कोले, जमादार, सत्तापा चव्हाण, दर्शन धुळे यांचे पथक त्यांच्या मागावर होते. त्यांनी प्रवीण जाधव व संदिप ढेरे यांना ताब्यात घेउन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.
हेही वाचा