Nashik Crime : शहरात दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे असणाऱ्यांवर आता मोक्का | पुढारी

Nashik Crime : शहरात दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे असणाऱ्यांवर आता मोक्का

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा

अंबड पाेलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून खून, दरोडा, हाणामारी, सशस्त्र हल्ले यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दिवसेंदिवस वाढतच असल्याने या गुन्हेगारीवर कुठेतरी नियंत्रण मिळावे, नागरिक सुरक्षित राहावे, यासाठी पाेलिस ॲक्शन मोडवर आले आहे. दोनपेक्षा अधर स्वरूपाचे गुन्हे असणाऱ्या गुंडांवर तडीपारीसह मोक्कांतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सराईत गुन्हेगार टिप्पर गँगच्या गौरव पाटीलवर एनपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या वेळी सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक प्रमोद वाघ, एमआयडीसी पाेलिस चौकीचे पाेलिस निरीक्षक मनोहर कारंडे उपस्थित होते.

टिप्पर गँगचा गौरव पाटील (२३, रा कलाकृती हाइट्स, वृंदावननगर अंबड) वर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्याला एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. वाढत्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी लक्षात घेत टिप्पर गॅंगमध्ये सक्रिय असणारा शेवटचा गुन्हेगार गौरव पाटीलच्या शोधार्थ पोलिस होते. अखेर त्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पाेलिस निरीक्षक प्रमोद वाघ तसेच एमआयडीसी पाेलिस चौकीचे निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चुंचाळे पोलिस चौकीचे गुन्हे शोध पथकाचे पाेलिस उपनिरीक्षक संदीप पवार, जनार्दन ढाकणे यांच्या पथकाने कुख्यात गुंड गौरव पाटीलला चाकण (पुणे) येथून मध्यरात्री ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली. गौरव पाटीलचा नुकताच झालेल्या संदीप आठवले खून प्रकरणात काही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संबंध आहे का, याबाबतही शहानिशा केली जात असल्याची माहिती अंबड पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button