अन् विमानातही जल्लोष! | पुढारी

अन् विमानातही जल्लोष!

नवी दिल्ली : 23 ऑगस्ट रोजी ‘चांद्रयान-3’ ने यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले आणि अवघ्या देशभरात आनंदाला उधाण आले. इस्रोमध्ये सर्व सहकार्‍यांनी एकमेकांचे अभिनंदन केले आणि देशभरातील जनतेने देखील सोशल मीडियावर याचा आनंद साजरा केला. यादरम्यान, जवळपास 20 मिनिटे सर्वांचा श्वासच जणू रोखला गेला होता.

लाखो लोक टीव्हीसमोर डोळे खिळून होते. याचवेळी इंडिगोचे एक विमान आपल्या प्रवासात होते. त्यातील प्रवाशांना, केबिन क्र्यूला देखील चांद्रयानाबाबत उत्सुकता होती. यादरम्यान, चांद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर पायलटने त्याची अधिकृत घोषणा केली आणि विमानातील प्रवाशांनी तेथेच टाळ्यांच्या गजरात इस्रोच्या संशोधकांचे अभिनंदन केले.

विमानातील प्रवाशांचा हा जल्लोष एका व्हिडीओच्या माध्यमातून ट्विट करण्यात आला. ‘चांद्रयान-3’ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्याची माहिती पायलटने दिली आणि त्यानंतर प्रवाशांनी कसा आपला आनंद साजरा केला, हे या व्हिडीओत दिसून येते.

‘आम्ही अतिशय महत्त्वाची घोषणा करत आहोत आणि ही घोषणा करताना आम्हाला अगदी मनापासून आनंद होतो आहे. इस्रोने लाँच केलेले ‘चांद्रयान-3’ दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाले आहे. इस्रोचे या अद्भुत कामगिरीबद्दल विशेष अभिनंदन. जय हिंद’, असे इंडिगो पायलटने या व्हिडीओत म्हटले.

Back to top button