दहा वर्षांत यंदा नीचांकी पाऊस ; जून ते ऑगस्टअखेर 200 मिलिमीटरची तूट | पुढारी

दहा वर्षांत यंदा नीचांकी पाऊस ; जून ते ऑगस्टअखेर 200 मिलिमीटरची तूट

आशिष देशमुख

पुणे :  पुणे शहरात यंदाच्या पावसाळ्यात गेल्या दहा वर्षांतील नीचांकी पाऊस झाला आहे. जून महिन्यात तब्बल 136 मिलिमीटरची तूट ऑगस्टपर्यंत भरून निघाली नाही, त्यामुळे शहरात पावसाळ्याच्या तीन महिन्यांत केवळ 279 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. प्रत्यक्षात शहराची जून ते ऑगस्टपर्यंतची सरासरी 460.4 मि. मी. इतकी आहे.
गेल्या पंचवीस वर्षांचा पुणे शहराचा पावसाचा ताळेबंद तपासला असता असे लक्षात येते की, शहरात वर्षभर पाऊस पडतोच. वर्षभराची सरासरी 781.9 मि. मी. इतकी आहे. त्यातील 490 मि. मी. म्हणजे साठ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत शहरात पडतो. जून व जुलैची शहराची सरासरी 171 मि. मी. इतकी आहे. मात्र, यंदा जून महिन्यात तब्बल 136 मि. मी.ची तूट पडली. तर ऑगस्ट अखेर 45 ते 48 मि. मी.ची तूट आहे. जुलैमध्ये 21 मि. मी. ची तूट होती, त्यामुळे ऑगस्टअखेर 180 ते 200 मि. मी.ची तूट यंदा पडली आहे. गेल्या दहा वर्षांतील हा नीचांक आहे.
आता मदार सप्टेंबर व ऑक्टोबरवर
शहरात जवळजवळ वर्षभर पाऊस पडतो. मात्र, जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत वर्षभरातील 60 टक्के पाऊस पडतो. मात्र, यंदा जून महिन्यात सर्वांत कमी पाऊस पडला. गेल्या 122 वर्षातला हा नीचांकी पाऊस होता. ही बाब हवामान विभागानेच जाहीर केली आहे. तर ऑगस्टमध्येही आजवरचा सर्वांत कमी पाऊस पडला आहे. परतीचा पाऊस 17 ते 20 सप्टेंबर रोजी राजस्थानातून सुरू होतो. महाराष्ट्रातून त्याचा प्रवास 6 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होतो. त्यामुळे आता सप्टेंबर व ऑक्टोबरच्या पावसावर मदार आहे.
यंदा शहरात झालेला पाऊस
जून 2023ः 35 मि. मी., (तूट : 136 मि. मी.)
जुलै 2023ः 150 मि. मी. (तूट : 21 मि. मी.)
ऑगस्ट 2023 : 94 मि. मी. (तूट : 45 मि. मी.)
तीन महिन्यांत सरासरी पडतो : 460 मि. मी.
यंदा तीन महिन्यांत पडला : 279 मि. मी.
एकूण तूट : 180 ते 200 मि. मी.
पावसाचा विक्रम (ऑगस्ट)
सर्वाधिक पाऊस ः378 मि. मी. (ऑगस्ट 2006)
सर्वात कमी पाऊस : 12.4 मि. मी. (ऑगस्ट 1972)
24 तासांत मोठा : 141 .7 मि. मी. (17 ऑगस्ट 1987
जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत फक्त जुलैमध्ये बरा पाऊस झाला. मात्र, मान्सूनचे आगमन यंदा 10 जूनऐवजी 25 जून रोजी झाले, त्यामुळे त्या महिन्यात जेवढा सरासरी पाऊस बरसतो तो पडला नाही, तर ऑगस्टमध्येही कमी पाऊस झाला. शहरात वार्‍याचा वेग सतत कमी होता. घाटमाथ्यावर तो वेग चांगला होता. त्यामुळे तेथे चांगला पाऊस झाला.
– अनुपम कश्यपी, हवामान विभाग प्रमुख, पुणे वेधशाळा
यंदाच्या ऑगस्टमधील सर्वांत मोठा पाऊस
शनिवारी (दि.26) दुपारी चांगला पाऊस झाला. मात्र, सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात केवळ 1 मि.मी. पावसाची नोंद झाली. रात्री उशिरापर्यंत शहरात बहुतांश भागात संततधार पाऊस झाला. त्यामुळे गेल्या 24 तासांत लोहगाव भागात 11.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. शनिवारचा पाऊस हा यंदाच्या ऑगस्टमधील सर्वांत मोठा पाऊस ठरला. कारण, या महिन्यात 0.5 ते 3 मि. मी. पावसाची नोंद झाली होती.
गेल्या 24 तासांतला पाऊस :
शिवाजीनगर : 6 मि. मी., पाषाण : 7.1 मि. मी., लोहगाव : 11.6 मि. मी.,लवळे : 0.5 मि. मी., मगरपट्टा : 1 मि. मी.
हेही वाचा : 

Back to top button