

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
जुने सिडको भागातील छत्रपती शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथे गुरुवारी (दि. 24) सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान संदीप आठवले या तरुणाचा खून करणाऱ्या पाच संशयितांना न्यायालयात उभे केले असता त्यांना सोमवार (दि.२८)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली, तर तिघा अल्पवयीनांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
मृत संदीप हा त्याच्या भावासह शॉपिंग सेंटर येथे जाताना तेथे दबा धरून बसलेल्या आठ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने संदीपवर धारदार शस्त्राने वार केले होते. यात संदीपचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपआयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, उपआयुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे डॉ. सीताराम कोल्हे, सहायक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या समवेत अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथके रवाना करत अवघ्या तीन तासांत पाच संशयितांसह तिघा अल्पवयीनांना अटक केली होती.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस निरीक्षक अशोक नजन, पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार, उपनिरीक्षक नाईद शेख, अंमलदार रवींद्रकुमार पानसरे, जनार्दन ढाकणे, अर्जुन कांदळकर, किरण सोनवणे, सुरेश जाधव, संदीप भुरे, राकेश राऊत, सागर जाधव, घनश्याम भोये यांच्या पथकाने मखमलाबाद येथे जाऊन मुख्य संशयित ओम प्रकाश पवार ऊर्फ मोठ्या ओम्या खटकी (१९, रा. रो हाउस नंबर २, पाटीदार पार्कजवळ, आव्हाड पेट्रोलपंपासमोर, पाथर्डी फाटा, नाशिक), ओम चौधरी ऊर्फ छोटा खटकी (१९, रा. ब्लॉक नंबर १, कृष्णा अपार्टमेंट, शिवप्रताप चौक, नवीन नाशिक), साईनाथ गणेश मोरताटे ऊर्फ मॅगी मोऱ्या (१९, रा. महादेव मंदिरासमोर, पवननगर), सौरभ राजेश वडनेरे ऊर्फ बाळा (१९, रा. चामुंडा अपार्टमेंट, पांडवनगरी, इंदिरानगर), अनिल राममूरत प्रजापती (१९, रा. राजरत्ननगर) यांच्यासह तिघा विधिसंघर्षितांना ताब्यात घेतले.
पोलिसांचे पायी पेट्रोलिंग
सिडको-अंबड भागात खुनाच्या घटनेनंतर पोलिस अॅक्शन मोडवर आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली सिडको भागात पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी पायी पेट्रोलिंग सुरू केले आहे. तसेच चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
हेही वाचा :