Tamil Nadu train fire | मदुराईजवळ रेल्वे डब्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, १० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, २० जखमी | पुढारी

Tamil Nadu train fire | मदुराईजवळ रेल्वे डब्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, १० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, २० जखमी

पुढारी ऑनलाईन : लखनौ- रामेश्वरम रेल्वेच्या एका पर्यटक डब्याला शनिवारी पहाटे ५.१५ वाजता आग लागली. या दुर्घटनेत १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर २० प्रवासी जखमी झाले आहेत. मदुराई रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. लखनौ येथून आलेल्या भाविकांनी प्रवास करताना सोबत गॅस सिलिंडर आणला होता. त्यांनी मदुराई रेल्वे स्थानकाजवळ उभ्या केलेल्या डब्यात प्रवाशांनी कॉफी बनवण्यासाठी गॅसची शेगडी पेटवली तेव्हा गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे आग लागली असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. (Tamil Nadu train fire) दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत दक्षिण रेल्वेने जाहीर केली आहे.

डब्यात गॅस सिलिंडरचा वापर करून लोक स्वयंपाक करत होते. या दरम्यान स्फोट झाला. आग लागल्यानंतर काही प्रवाशी पेटत्या डब्यातून बाहेर पडले, तर वृद्ध प्रवाशांना वेळेत बाहेर पडता आले नाही. यामुळे त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

शनिवारी पहाटे मदुराई रेल्वे स्थानकाजवळ बोदी लेनवर उभ्या असलेल्या पर्यटक रेल्वेला ही आग लागली. यात १० जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे २० जण जखमी झाले, असे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे. या दुर्घटनेतील जखमींना मदुराईच्या सरकारी राजाजी रुग्णालयात नेण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. एका प्रवाशाने कॉफी बनवण्यासाठी गॅसची शेगडी पेटवल्याने ही आग लागली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

“आज पहाटे साडेपाचच्या सुमारास मदुराई रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एका डब्याला आग लागली. त्यात उत्तर प्रदेशातून प्रवास करुन आलेले भाविक होते. त्यांनी कॉफी बनवण्यासाठी गॅसची शेगडी पेटवली तेव्हा गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. आत्तापर्यंत नऊ मृतदेह मिळाले आहेत,” असे मदुराईचे जिल्हाधिकारी एमएस संगीता यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. (Tamil Nadu train fire)

दक्षिण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बी. गुगानेसन यांनी दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांनी डब्यात गॅस सिलिंडर आणला होता. त्याला आग लागली. ज्या डब्यात आग लागली तो नागरकोईल जंक्शन येथे शुक्रवारी पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसला जोडला होता आणि मदुराई येथे आल्यानंतर तो वेगळा करण्यात आला होता.

“हा एक खासगी डबा आहे जो काल (२५ ऑगस्ट) ट्रेन क्रमांक १६७३० (पुनालूर-मदुराई एक्स्प्रेस) ला नागरकोईल जंक्शन येथे जोडला होता. हा डबा वेगळा करून मदुराई स्टेबलिंग लाईनवर ठेवण्यात आला होता. खासगी डब्यात प्रवाशांनी अवैधरित्या गॅस सिलिंडर आणला होता. या गॅस सिलिंडरमुळे आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच अनेक प्रवासी डब्यातून बाहेर पडले होते. काही प्रवासी प्लॅटफॉर्मवरच खाली उतरले होते,” असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Back to top button