नाशिक : निवाणे ग्रामपंचायतीत ३० लाखांचा अपहार | पुढारी

नाशिक : निवाणे ग्रामपंचायतीत ३० लाखांचा अपहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कळवण तालुक्यातील निवाणे-दह्याणे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये पेसा अंतर्गत शासकीय योजनेत रक्कम ३० लाख ४९ हजार ८९४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व पेसा सदस्य यांच्याविरोधात पंचायत समिती ग्रामपंचायत विस्तार अधिकारी युवराज सयाजी सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

निवाणे-दह्याणे ग्रुप ग्रामपंचायतीत सन २०१६, २०१७, २०१८, ते २०२० ते २०२१ दरम्यान पेसा अंतर्गत व शासकीय योजनेत तत्कालीन सरपंच बेबीबाई सोनवणे, ग्रामसेवक भास्कर पुंजाराम बागूल व पेसा सदस्या यशोदाबाई विठोबा माळी यांनी शासनाच्या विविध विकासकामांसाठी आलेल्या निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करून अपहार केल्याचा आरोप फिर्यादीत आहे. याबाबत निवाणेतील बाळासाहेब आहेर व संगीता आहेर या ग्रामस्थांनी वेळोवेळी गटविकास अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने आहेर व ग्रामस्थांनी १४ ऑगस्ट रोजी पंचायत समितीसमोर उपोषणास बसण्याचे निवेदन दिले होते.

सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी विशाल नरवाडे यांच्या मध्यस्थीने व आश्वासनाने उपोषण मागे घेतल्यानंतर पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी युवराज सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार पेसा अंतर्गत शासकीय योजनेत ३० लाख ४९ हजार ८९४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

निवाणे ग्रामपंचायतीत १४ वित्त आयोग, पेसा व इतर निधीतील कामे यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत वेळोवेळी तत्कालीन पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र झारीतील शुक्राचार्यांच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे कारवाईस विलंब झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषींकडून अपहार झालेली शासकीय रक्कम वसूल करावी.

– बाळासाहेब आहेर, ग्रामस्थ निवाणे

हेही वाचा :

Back to top button