पाणी मागणी अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या; माजी आ. स्नेहलता कोल्हे यांची पाटबंधारेकडे मागणी | पुढारी

पाणी मागणी अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या; माजी आ. स्नेहलता कोल्हे यांची पाटबंधारेकडे मागणी

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जलसंपदा विभागाकडून गोदावरी डावा व उजवा कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांकडून पाण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत नमुना नंबर 7 मागणी अर्ज मागविण्यात आलेले आहेत; परंतु शेतकर्‍यांचे खरीप हंगामाचे नियोजन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी लाभधारक शेतकर्‍यांना 25 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोल्हे यांनी यासंदर्भात नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, कोपरगाव येथील गोदावरी डावा तट कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता आणि राहाता येथील गोदावरी उजवा तट कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन दिले असून, त्यात वरील मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले की, कोपरगाव व राहाता हे अवर्षणप्रवण तालुके असून, या दोन्ही तालुक्यांना दारणा धरणातून गोदावरी डावा व उजवा कालव्यांद्वारे पाणीपुरवठा होतो. गोदावरी डावा व उजवा कालव्यांद्वारे मिळणार्‍या पाण्यावरच या भागातील शेतकरी पिके घेतात. यंदा पावसाळ्याचे दोन महिने उलटले तरी कोपरगाव मतदारसंघात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही.

पावसाळ्याच्या सुरुवातीला आलेल्या जेमतेम पावसावर कोपरगाव व राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांनी बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, तूर, मूग आदी पिकांची लागवड केली; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत.
पाण्याअभावी अनेक ठिकाणी शेतातील उभी पिके करपून गेली आहेत. खरीप पिकांना सध्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे. या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा बिकट परिस्थितीत गोदावरी डावा व उजवा कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची संपूर्ण मदार गोदावरी कालव्यातून मिळणार्‍या पाण्यावरच आहे.

पाणी मागणीचे अर्ज भरावेत

सर्व शेतकरी बांधवांनी आपला पाणी मागणी हक्क 7 नंबर अर्ज जास्तीत जास्त संख्येने भरावे. ज्यामुळे आपल्याला मिळणारे पाणी हे कमी होणार नाही व त्यावरचा आपला हक्क अबाधित राहील.

हेही वाचा

श्रावणाच्या प्रारंभी त्र्यंबकला उसळली भाविकांची गर्दी

अकरा महिन्यांनंतर बुमराहची गोलंदाजी

लहानगे व्हायरल फिव्हर, आय फ्लूने बेजार !

Back to top button