

पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार यांच्यापासून लोक फुटून गेले आहेत. तरीही हे लाेक शऱद पवार आमचे नेते आहेत, असे म्हणत आहेत; पण हे त्यांचे ढोंग आहे. अशा शब्दांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला. (Sanjay Raut)
माध्यमांशी बाेलताना राऊत म्हणाले, जो पक्ष शरद पवार यांनी बनवला आणि त्यांच्या हयातीत तो पक्ष अजित पवारांना निवडणूक आयाेग देत आहे. हा कोणता न्याय आणि कायदा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हयातीत शिंदेना देता. हा कोणता कायदा, असा सवाल करत त्यांनी आपल्या देशात निवडणुक आयोगाचा गैरवापर केला जात आहे, असा आराेपही त्यांनी केला. देशातील संसदीय लोकशाही आणि निवडणुक आयोगाच्या भविष्याची आम्हाला चिंता वाटत आहे, असेही ते म्हणाले.
शरद पवारांनी इशारा देवूनही अजित पवार गटाकडून त्यांचे फोटो वापरला जात आहेत. बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना म्हणाले होते की, "माझा फोटो वापरु नका. जर तुम्ही माझ्यापासून दुर गेला आहात, माझ्या पक्षापासुन दूर गेला आहात. माझा विचार तुम्हाला मान्य नाही." तरीही फुटून गेलेल्या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरणं सुुरु केलं. तेव्हाही बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सांगितल होत की, "फोटो वापरु नका", तसचं आज शरद पवार यांच्यापासुन लोक फुटून गेले आहेत. आणि ही लोक तरीही म्हणतात की, शऱद पवार आमचे नेते आहेत. पण हे त्यांच ढोंग आहे, असे राऊत म्हणाले.
"तुम्ही पक्षातून बाहेर निघालात; मग स्वत:चा पक्ष स्थापन करा. तुम्ही तुमचे फोटो लावा. तुम्हाला शरद पवार, बाळासाहेब ठाकरे कशाला हवे आहेत. तुमच्यात तेवढी धमक आणि हिम्मत नाही का. स्वत:चे फोटो आणि स्वत:च्या वडिलांचे फोटो लावा. तुम्ही म्हणता शरद पवार आमचे देव आहेत मग देवाच्या पाठीत का खंजीर खुपसला? बाळासाहेब देव आहे म्हणता मग बाळासाहेबांची शिवसेना का तोडली, असा सवालही त्यांनी केला.
मुंबईमध्ये इंडिया आघाडीची येत्या ३१ ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे. या बैठकीला आप आणि कॉंग्रेस नेते येणार आहेत. कॉंग्रेस आणि आपमध्ये कोणताही वाद नाही आहे. दोन्ही पक्ष एकत्र य़ेणार आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा