

चांदवड/नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चांदवड येथील सोमा टोल प्लाझावर भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परेड चालू असताना एका २५ वर्षीय कर्मचाऱ्याने पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेबाबत टोलचे व्यवस्थापक मनोज त्र्यबंक पवार (३८) यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिल्याने संबंधित टोल कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. दरम्यान, टोल प्लाझाच्या प्रशासनाने घटनेची दखल घेत या कर्मचाऱ्याचे तत्काळ निलंबन केले आहे.
भारत देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त चांदवडच्या सोमा टोल प्लाझाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी टोलवरील लेन नंबर ५ वर काम करीत असलेल्या एका २५ वर्षीय कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबाद अशी मोठ्याने देशविरोधी घोषणा दिली. यावेळी त्याठिकाणी काम करीत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी ही बाब टोल प्लाझाचे व्यवस्थापक मनोज पवार यांना सांगितली. या घटनेची माहिती टोल व्यवस्थापनाने चांदवडच्या प्रभारी पोलिस अधिकारी सविता गर्जे यांना दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ टोलवर जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पोलिस निरीक्षक शहाजी उमाप, मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाडचे पोलिस उपअधीक्षक सोहेल शेख यांनी चांदवडला येऊन या आरोपीला ताब्यात घेत त्याची रात्रभर कसून चौकशी केली आहे. बुधवारी (दि.१६) पहाटेच्या सुमारास चांदवड पोलिसांत संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलिस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक रामदास धुमाळ करीत आहेत.
चांदवड टोलनाक्यावर स्वातंत्र्य दिनाची परेड सुरू असताना एका कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबादची घोषणा दिली. या घटनेबाबत संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे.
– सविता गर्जे, प्रभारी पोलिस अधिकारी, चांदवड
हेही वाचा :