नाशिक : अनधिकृत बायोडिझेल पंपावर छापा; चौघांना अटक | पुढारी

नाशिक : अनधिकृत बायोडिझेल पंपावर छापा; चौघांना अटक

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरात अजून एक अनधिकृत बायोडिझेल पंप मिळून आला आहे. पोलिस अधीक्षकांच्या पथकाने पुरवठा विभागासमवेत म्हाळदे शिवारात आ ज (सोमवार) छापेमारी केली. त्यात दोन मालट्रकमध्ये बायोडिझेल भरण्याची तयारी सुरु असतानाच मालकासह चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संबंधिता विरोधात पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शहर परिसरात बेकायदेशीररित्या बायोडिझेलविक्रीचे प्रमाण वाढले आहे. या विषयी प्राप्त तक्रारींनुसार पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पेरलेल्या खबर्‍यांमार्फत म्हाळदे शिवारात अनधिकृत डिझेलविक्री होत असल्याची माहिती मिळाली.

त्याप्रमाणे पुरवठा निरीक्षक अशोक सावणे व सहायक पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या पथकाने सोमवारी 2 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.

मुंबई-आग्रा महामार्गापासून दीडशे मीटर अंतरावर नमीरा फॅब्रिक्स लगतच्या पत्र्याच्या शेडजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या. या ठिकाणी उभ्या दोन ट्रक पैकी एकात (एमएच 19 झेड 5429) दोन व्यक्ती प्लास्टिक टाकिमधून नोझल मशिनच्या सहाय्याने इंधन भरताना दिसले. पथकाने जलद कारवाई करित दोन्ही ट्रकच्या चालकांसह तेथील दोघांना पकडले.

नदीम खान रशीद खान (26, रा. गुलशने इब्राहिम) याने हा साठा स्वत:चा असल्याची कबुली दिली. त्याचा साथीदार समशोद्दीन कलीमोद्दीन (40, रा. वजीरखान रोड) हा इंधन भरण्याचे काम करत होता.

तर ट्रकचालक मो. अजीम अब्दुल आरिफ (27, रा. गुलशेर नगर) व अब्दुल मलिक गुलाम रसुल (26, रा. गुलशने यासिन) यांच्यावर अटकेची कारवाई झाली.

घटनास्थळावरुन 2200 लिटर बायोडिझेल, इंधन भरण्याचे साहित्य, दोन मालट्रक, विद्युत पंप असा 13 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पवारवाडी पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात बेकायदेशीर इंधनविक्री प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हे वाचा…

Back to top button