Nashik : पालकांनो खबरदार! अल्पवयीन मुलांकडे वाहन द्याल; तर जेलमध्ये जाल | पुढारी

Nashik : पालकांनो खबरदार! अल्पवयीन मुलांकडे वाहन द्याल; तर जेलमध्ये जाल

पंचवटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांना तीन वर्षे कारावास अन् २५ हजारांच्या दंडाची तरतूद कायद्यात केली असून, पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे व प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी केले आहे.

अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यांवर वाहने चालविण्याचे प्रकार वाढत चालले आहे. त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. १८ वर्षांखालील मुलांना वाहन चालविण्याची परवानगी पालकांनी / वाहनचालकांनी देऊ नये, अशा प्रकारचे प्रबोधन प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिका-यांनी एप्रिल २०२३ मध्ये विविध शाळा, खासगी क्लासेस तसेच महाविद्यालयात जाऊन केले होते. त्यानंतर यावेळी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. यात एकूण ३५ वाहनांवर कारवाई करून न्यायालयात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी एका गुन्ह्यात निकाल लागलेला असून, यात पालकास दंडासह शिक्षा झालेली आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहन चालविण्यास देऊ नये आणि अशा प्रकारे दंडात्मक कारवाई होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी केले आहे.

३५ वाहनांवर कारवाई अन् एकाला शिक्षा

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एप्रिल २०२३ मध्ये विविध शाळा, खासगी क्लासेस तसेच महाविद्यालयात १८ वर्षांखालील पाल्यांना वाहन चालविण्यास देऊ नये याबाबत प्रबोधन केले होते. त्यानंतर याबाबत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. यात एकूण ३५ वाहनांवर कारवाई करून न्यायालयात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

– प्रदीप शिंदे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक

हेही वाचा :

Back to top button