Buldhana : मलकापूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर | पुढारी

Buldhana : मलकापूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मलकापूर (जि. बुलढाणा) तालुक्यातील भांडेगाव परिसरातून अमरनाथची यात्रा करून परत येणाऱ्या भाविकांच्या खासगी बसला मलकापूर जवळ आज (शनिवार) पहाटे अपघात झाला. या अपघातात ६ जण ठार तर 22 जण जखमी झाले. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे जाहीर केले आहे. (Buldhana )

माहितीनुसार, तालुक्यातील भांडेगाव येथील शिवाजी धनाजी जगताप (वय 55) हे मागील पाच ते सहा वर्षापासून दरवर्षी खासगी बसने अमरनाथ यात्रा काढतात. त्यासाठी परिसरातील भाविकांची नोंदणी करून त्यांना यात्रेमध्ये सहभागी करून घेतले जाते. मागील 22 दिवसांपूर्वी त्यांनी यात्रा काढली होती. त्यासाठी भांडेगाव, लोहगाव, जयपूर, डिग्रस कऱ्हाळे, साटंबा या गावातील भाविकांनी नोंदणी केली होती. सुमारे 30 भाविक या यात्रेत सहभागी झाले होते.

Buldhana : ६ जण ठार; १ गंभीर जखमी

अमरनाथ येथून दर्शन घेऊन सर्व भाविक गावाकडे परत येत होते. मात्र मलकापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर पहाटे तीन वाजता त्यांच्या बसला नागपूर येथून नाशिककडे जाणाऱ्या एका खाजगी बसने (एमएच-27-बीएक्स-4466) समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात भाविकांच्या बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला. अपघातात शिवाजी धनाजी जगताप (55, भांडेगाव), बस चालक संतोष आनंदराव जगताप (38 भांडेगाव) राधाबाई सखाराम गाडे (50, जयपूर), सचिन शिवाजी माघाडे (30 लोहगाव), अर्चना गोपाल घुक्से (30, डिग्रस कऱ्हाळे) यांचा जागीच मृत्यू झाल्याचे मलकापूर पोलिसांनी सांगितले.

या अपघातात 22 प्रवासी जखमी झाले असून, यामध्ये गिताबाई बद्रीनाथ कऱ्हाळे (46 डिग्रस कऱ्हाळे) यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व जखमींना बुलढाणा येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे मलकापूर पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांनी मलकापूर पोलिसांशी संपर्क साधून जखमींबाबत चौकशी केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत 

मलकापूर (जि. बुलढाणा) शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर आज दोन खाजगी बसच्या अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले आहेत. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून १९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button