टोलनाके फोडणे सोपे, त्याला अक्कल लागत नाही : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा मनसेवर निशाणा | पुढारी

टोलनाके फोडणे सोपे, त्याला अक्कल लागत नाही : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा मनसेवर निशाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जनतेच्या पैशांमधून महामार्गावर टोलानाके बांधले जातात. हे टोलनाके फोडणे फार सोपे आहे. फोडायला अक्कल लागत नाही परंतु जोडायला आणि बनवायला मात्र अक्कल लागते. त्यामुळे काहीतरी बनवायला शिकले पाहिजे, असा टोला भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ मनसे नेते अमित ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना लगावला. मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना येणाऱ्या दिवसांत नक्की महिला मंत्री झालेल्या दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजप नेत्या चित्रा वाघ मंगळवारी (दि.२५) नाशिक दौऱ्यावर आल्या होत्या. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गोंदे टोलनाका येथील मनसेच्या राड्या प्रकरणाबाबत त्यांनी जागेवर नक्की काय झाले हे माहिती नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, या प्रकरणाचा निषेध त्यांनी केला. मणिपूरमधील घटनेकडे वाघ यांचे लक्ष वेधले असता या घटनेचे समर्थन होऊ शकत नाही. या घटनेचे आम्हालाही अतीव दुःख आहे. या घटनेत काही तासांत आरोपी पकडले गेले. ज्यावेळी सरकार सांगते आपण मणिपूरच्या प्रश्नावर चर्चा करायला तयार आहे. पण केवळ राहुल गांधी संसदेत नसल्याने संसद चालू द्यायची नाही, असा विरोधकांचा पवित्रा आहे. महिलांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी सरकार तयार असताना विरोधी पक्ष का येत नाही? असा प्रश्न उपस्थित करत विरोधक केवळ राजकारण करत असल्याची टीका वाघ यांनी केली. असे प्रश्न मीडियासमोर गेल्याने सुटत नाही तर हाउसमध्ये आल्याने सुटतात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

नाशिकमध्ये गरोदर महिलांना झोळीत नेण्यात येत असल्याच्या प्रकरणावर बोलताना वाघ यांनी ही घटना व प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, अधिवेशनात आमचे लोकप्रतिनिधी हा प्रश्न मांडतील. या त्रुटी सोडवल्या जातील, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला.

चर्चा हाउसमध्ये करा

पश्चिम बंगालची एक महिला मुख्यमंत्री तिथल्या महिलांचे दुःख समजू शकत नाही का? असा प्रश्न करत हिंमत असेल तर मणिपूरची चर्चा हाउसमध्ये करा, असे आव्हान चित्रा वाघ यांनी विरोधकांना दिले. त्यावेळी मणिपूर, मालदा आणि राजस्थानची चर्चा होईल, असे त्या म्हणाल्या. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खा. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीवर बोलताना वाघ यांनी हा प्रकार म्हणजे उंदराला मांजर साक्ष असा आहे. तू म्हणायचं, मी बोलायचं आणि आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची, असा हा प्रकार असल्याचे त्या म्हणाल्या.

हेही वाचा :

Back to top button