लवंगी मिरची : टीआरपी..! | पुढारी

लवंगी मिरची : टीआरपी..!

तुमचा टीआरपी किती? नाही, नाही, तसं नाही म्हणायचं मला; पण टीआरपी असेल तरच आज काही खरे आहे. एका प्रसिद्ध वाहिनीवर तुमचे जीवनातील कार्य दाखवणारी एक सीरियल टीआरपी नसल्यामुळे बंद करावी लागते आहे, आहात कुठे? आता कार्य वगैरे काही नाही, टीआरपी भक्कम पाहिजे. काय म्हणताय? तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करून गेलात तेव्हा टीआरपीची काळजी केली नाही? अहो, तसं नाही हो. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यावर एखादी सीरियल येते हेच फार मोठे आहे. म्हणजे काय आहे ना, सासा-सुनांची भांडणे, नात्यांमधील गुंते, विवाहित स्त्री-पुरुषांची प्रेमप्रकरणे, भयकथा, रहस्य कथा, पोलिसांच्या तपासाच्या कथा यांच्या गदरोळात तुमचा टीआरपी कसा वर राहील?

लोकमान्य, तुमच्या जीवनात संघर्ष होता, थरार होता; पण तो परकीय सत्तेच्या विरुद्ध होता. आता त्यात कोणाला रस वाटेल अशी शक्यता अजिबात नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेली पिढी आता निघून गेली आहे. किमान ही पिढी हयात असती, तर त्यांनी उत्सुकतेने तुमचे जीवन चरित्र पाहिले असते; पण आता आलेली नवी पिढी अद्भूत आहे. त्यांचे विषय वेगळे आहेत आणि तुमचे विषय वेगळे होते. आताची नवीन पिढीसुद्धा जहाल विचारांची आहे; पण त्यांचा जहालपणा वागण्या, बोलण्यात, पोशाखामध्ये आणि विविध प्रकारच्या फॅशनमध्ये दिसून येतो. विचारांचा संबंध जवळपास सगळीकडे संपुष्टात आलेला आहे, मग तुमचा टीआरपी कसा वाढेल?

शालेय जीवनात तुम्ही दाखवलेला बाणेदारपणा, आम्हाला खूप भारावून टाकायचा. इथे रस्त्या रस्त्यावर भांडणे चालू असतात. तुझ्या बापाचा रस्ता आहे का इथपासून बाणेदारपणाला सुरुवात होते ती क्वचित प्रसंगी मारामारीपर्यंत किंवा एकमेकांना चाकूने इजा करण्यापर्यंत जाते. आता तुमच्या चरित्रात अशा मारामार्‍या नाहीत म्हटल्यानंतर कोण पाहणार ते? तुरुंगात तुम्ही सहा वर्ष काळ व्यतीत केला. आता या सहा वर्षांचे चित्रण समजा आजच्या कुणी सीरियलच्या दिग्दर्शकाने केले, तर ते पाहणार तरी कोण आणि मग त्या सीरियलचा टीआरपी वाढणार तरी कसा? टीआरपी कमी झाला की, जाहिराती कमी होतात, जाहिराती कमी झाल्या की सीरियल बंद पडते. तुमच्यावर असलेल्या एका सिरियलकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली, टीआरपी घसरला, जाहिराती बंद झाल्या आणि साहजिकच ती टीव्ही सीरियल पण बंद होत आहे. खरे तर त्या वेळेलाच तुम्ही काहीतरी नियोजन करायला हवे होते.

संबंधित बातम्या

ब्रिटिशांच्या बरोबर लढताना किमान चार-दोन ठिकाणी बॉम्ब पेरून ब्रिटिश साम्राज्याला धडक द्यायला हवी होती; पण तुमची पडली वैचारिक भूमिका. तुम्ही ब्रिटिशांशी न्यायालयात लढलात, कायदेशीर लढाई केलीत, किमान ती कायदेशीर लढाई तरी काहीतरी इंटरेस्टिंग करायला हवी होती, म्हणजे तुमच्यावरील टीव्ही सीरियलचा टीआरपीवर राहिला असता. हे तुम्हाला तेव्हाच सुचायला पाहिजे होते. टीआरपी नाही म्हणजे, जाहिराती नाहीत आणि जाहिराती नाहीत म्हणजे, सीरियल बंद. आता तुमच्या एवढ्या मोठ्या प्रदीर्घ आयुष्यामध्ये तुम्ही ब्रिटिशांबरोबर प्रदीर्घ असा लढा दिला तेव्हा एतद्देशीय लोक तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून तुमची खिल्ली उडवत असत. आता इतकी वर्ष गेल्यानंतर ते लोक पण तुमची सिरियल पाहायला तयार नाहीत. शिवाय, तुम्ही ज्या कोणत्या जातीचे होतात ते लोक पण सीरियल पाहायला तयार नाहीत. किमान तुमची जी कर्मभूमी होती त्या पुण्यातील लोकांनी तरी सीरियल पाहायला पाहिजे होती.

– झटका

Back to top button