सिंधुदुर्ग : देवगडमधील साटमवाडी येथे आंब्याचे झाड पडून चार घरांसह वाहनाचे नुकसान | पुढारी

सिंधुदुर्ग : देवगडमधील साटमवाडी येथे आंब्याचे झाड पडून चार घरांसह वाहनाचे नुकसान

देवगड : पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड साटमवाडी येथे आंब्याचे झाड पडून नजीकच्या चार घरांची छप्पर, गॅलरी  त्याचबरोबर या ठिकाणी उभी असलेल्या दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना घडली. मंगळवारी (दि. २५) दुपारी ३.१५ च्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसाने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १ लाख ७५ हजारांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ देवगड जामसांडे नगरपंचायतचे नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणाची पाहणी करून नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांमार्फत हे भले मोठे आंब्याचे झाड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले. घटनास्थळी देवगडचे तलाठी अंधारी यांनी देखील भेट देऊन पाहणी केली. यानंतर आंब्याचे कलम हटविल्यानंतर नुकसान भरपाईची पंच यादी करण्यात येणार आहे.

दुपारच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसात या घरातील लोक विश्रांती घेत होते. याच दरम्यान ही घटना घडली मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी नाही. दिनेश कुळकर्णी, तनुजा कुळकर्णी, दत्तात्रय पाटील, समीर कुळकर्णी, यांच्या घराचे छताचे व गॅलरीचे नुकसान झाले असून गिरीश कुलकर्णी यांच्या दुचाकीवर हे भले मोठे आंब्याचे झाड पडल्यामुळे दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Back to top button