नाशिक : हरिहरगड-दुगारवाडीला दुपारी 3 वाजेनंतर ‘नो एन्ट्री’, वनविभागाचा निर्णय | पुढारी

नाशिक : हरिहरगड-दुगारवाडीला दुपारी 3 वाजेनंतर 'नो एन्ट्री', वनविभागाचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधब्यात युवक वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वनविभाग सरसावला असून, वीकेण्डला हरिहरगड तसेच दुगारवाडी धबधबा या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना दुपारी तीन वाजेनंतर प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हौशी पर्यटकांच्या हुल्लडबाजीलाही लगाम बसणार आहे.

वरुणराजाच्या कृपेने त्र्यंबकेश्वर तालुका हिरवाईने नटला आहे. हरिहरगडासह दुगारवाडी आणि नेकलेस धबधबा या ठिकाणी पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहेत. वीकेण्डला होणारी गर्दी तसेच पावसाच्या संततधारेमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच दुगारवाडी येथे युवक बुडाल्याच्या घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चिला जात हाेता. पावसाळी पर्यटनासह त्र्यंबकेश्वर परिसराला पर्यटकांकडून पसंती दिली जाते. हरिहरगडासह दुगारवाडी धबधबा परिसरात पर्यटकांचे ट्रॅफिक जाम होते. त्या पार्श्वभूमीवर वीकेण्डला हरिहरगडावर जाण्यासाठी, तर दुगारवाडी धबधब्याजवळ खाली जाण्यासाठी दुपारी तीननंतर मनाई असणार आहे. त्यामुळे गडावरून उतरणाऱ्या व धबधब्याजवळून वर चढणाऱ्या पर्यटकांची गर्दी होणार नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

अंजनेरीला निर्बंध असणार

अंजनेरी गडावरही पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन तैनात वन कर्मचाऱ्यांना निर्बंधांबाबत सूचना दिल्या आहेत. विशेषत: वीकेण्डला पर्यटकांची गर्दी झाल्यास गडावर प्रवेश नाकारला जाईल, असे नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांनी सांगितले.

वीकेण्डला हरिहरगड आणि दुगारवाडीला पर्यटकांची गर्दी होत असून, वनकर्मचाऱ्यांसह स्थानिक वनव्यवस्थापन समितीचे सदस्य नियंत्रणासाठी नियुक्त केले आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वीकेण्डला दुपारनंतर प्रवेश मनाईचा निर्णय घेतला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

– राजेश पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, त्र्यंबकेश्वर

हेही वाचा :

Back to top button