नाशिक : १७५ बियाणे, ६५ खतांच्या विक्रीवर जिल्ह्यात बंदी  | पुढारी

नाशिक : १७५ बियाणे, ६५ खतांच्या विक्रीवर जिल्ह्यात बंदी 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा| वैभव कातकाडे

जिल्ह्यात कृषी विभागाने बोगस बियाणे, खते यांना आळा घालण्यासाठी एकूण १७ भरारी पथके स्थापन केली होती. त्यामध्ये विभागस्तर, जिल्हास्तरावर प्रत्येेकी एक, तर तालुकास्तरावर १५ पथकांचा समावेश आहे. या पथकाने दि. १ एप्रिलपासून १७५ बोगस बियाणांचे विक्री बंद आदेश, ६५ खतांचे विक्री बंद आदेश, ९ कीटकनाशकांचे विक्री बंद आदेश, ९ पेस्टिसाइड्स कंपन्यांने परवाने निलंबित, तर २७ बोगस खतांचे परवाने निलंबित केले आहेत. भरारी पथकाच्या धाडसत्राने कृषीच्या बाबतीत बेकायदेशीर कामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या मुबलक प्रमाणात बियाणांचा पुरवठा आहे. तसेच खतेही उपलब्ध आहेत. कोणी दुकानदार जादा दराने विक्री करत असेल किंवा ठराविक उत्पादन घेण्यास बळजबरी करत असल्यास शेतकऱ्यांनी त्वरित कृषि विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी कार्यालयाकडे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांनी केले आहे.

राज्यभरातील शेतकऱ्यांना वेळोवेळी विविध कंपन्यांच्या बनावट बियाणांचा व खताच्या माध्यमातून खरेदी करताना फसवणूक होत होती. याकरिता कठोर कायदा होण्यासाठी महायुती सरकारने राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आदी मंत्र्यांचा समावेश आहे. ही समिती प्राप्त तक्रारींचा अहवाल तयार करून कायदा तयार करणार आहे.

नियमित तपासण्या सुरू

कृषी विभागाने तयार केलेल्या भरारी पथकांच्या आधारे नियमित तपासण्या सुरू आहेत. तसेच भरारी पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्या स्रोतामार्फत मि‌ळालेल्या माहितीच्या आधारे धाडसत्र राबवित आहे. त्यानुसार संशयास्पद काही आढळल्यास त्वरित कारवाईमुळे शेतकरी बोगस बियाणे घेण्यापासून परावृत्त होत आहेत.

येथे करा तक्रार

नाशिक जिल्ह्यामधील खते, बियाणे कीटकनाशके उपलब्धतेबाबत किंवा गुणवत्तेबाबत तक्रार करावयाच्या असल्यास मो. नं. 7821032408 वर व्हाॅट्सॲपद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button