नगर : अपघातामध्ये जवानासह दोघे ठार; एकजण गंभीर | पुढारी

नगर : अपघातामध्ये जवानासह दोघे ठार; एकजण गंभीर

पोहेगाव : पुढारी वृत्तसेवा :  शिर्डी- नाशिक महामार्गावर 16 जुलै रोजी पाथरे शिवारात झालेल्या अपघातात भारतीय सैन्य दलातील (धानोरे, ता. निफाड) येथील जवान सचिन राजाराम गुजर (वय 24 वर्षे) व अक्षय पाटीलबा जावळे (वय 25 वर्षे, रा. सोनेवाडी, ता. कोपरगाव) या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, अक्षय गायकवाड (रा. खेडलेझुंगे) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अक्षय जावळे व सचिन गुजर हे दोघे मावस भाऊ होते. त्यांच्या अपघाती अकाली निधनाने सोनेवाडी व धानोरे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. शिर्डी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन राहाता ग्रामीण रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन केले.

अक्षय जावळे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात सोनेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, शिर्डी येथे उपचारादरम्यान सचिन गुजर यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात धानोरे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सिन्नर येथून पल्सर मोटारसायकल (एम एच 15 एच ए 9006 ) वरुन जावळे व गुजर सोनेवाडीला येत असताना अक्षय गायकवाड यांच्या प्लॅॅटिना मोटारसायकल (एम एच 15 डीबी 9670) विरुद्ध दिशेला वळत असताना दोन्ही दुचाकींची जोरदस्त धडक झाली. या अपघाताचा आवाज ऐकून पाथरेचे सरपंच मच्छिंद्र चिने व मनोज गवळी यांनी मोबाईल व आधार कार्डचा संदर्भ घेत जखमींच्या नातेवाईकांना या संदर्भात कल्पना दिली. अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने शिर्डी येथे सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अक्षय जावळे यांचा दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले. जवान सचिन गुजर यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचाराला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचाही काल दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातातील आणखी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजली. दरम्यान, ऐन तारुण्यातील दोन मावस भाऊ अपघाती मृत पावल्याने सोनेवाडीसह परिसरात हळ-हळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा :

पारनेरला 29 कोटी रूपयांचा निधी ; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदादांचे गिफ्ट

अजित पवारांसोबत जाणे ठरले फलदायी, देवळाली मतदारसंघातील विकासकामांठी ४० कोटी

Back to top button