नाशिक महापालिकेचा जुलैअखेर पर्यावरण महोत्सव | पुढारी

नाशिक महापालिकेचा जुलैअखेर पर्यावरण महोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिककरांना पुष्पोत्सवाची मेजवानी दिल्यानंतर महापालिका आता जुलैअखेर तीन दिवस पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करणार आहे. त्यात औषधी वनस्पती, भारतीय प्रजातींचे वृक्ष यांचा जागर करणे हा प्रमुख हेतू आहे. मुंबई नाका येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.

महापालिकेने मार्च महिन्यात भव्य तीन दिवसीय पुष्प प्रदर्शन आयोजन केले होते. तब्बल एक लाखांहून अधिक नागरिकांनी महोत्सवाला भेट दिली होती. देशीसह विदेशी पुष्प रोपांची माहिती या ठिकाणी नागरिकांना पाहायला मिळाली. त्याच धर्तीवर आता महापालिका पर्यावरण व गोदासंवर्धन विभाग पर्यावरण महोत्सव आयोजित करणार आहे. त्यात सत्तर विविध प्रजातींच्या वनस्पती, फळझाडे, वृक्ष यांचे प्रदर्शन ठेवले जाईल. त्यात वृक्षांची माहिती, लागवड कशी करावी, संगोपन कसे करावे याची इत्यंभूत माहिती दिली जाईल. पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या दूर्वांकुर या संस्थेच्या मदतीने महोत्सव भरवला जाईल. त्यावर अंतिम टप्प्यात काम सुरू आहे. महोत्सवासाठी पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या नामवंत व्यक्तीला ब्रॅण्ड अम्बेसिडर म्हणून बोलावले जाईल. हा तीन दिवसीय महोत्सव पर्यावरणप्रेमींसाठी मोठी मेजवानी ठरेल.

पुष्पोत्सवाच्या धर्तीवर तीन दिवसीय पर्यावरण महोत्सव आयोजित केला जाणार आहे. भारतातील प्रजातींच्या वृक्षाची माहिती त्यामार्फत दिली जाईल.

– विजयकुमार मुंढे, उपआयुक्त, गोदावरी व पर्यावरण संवर्धन कक्ष, मनपा

हेही वाचा : 

Back to top button