नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हिमाचल प्रदेशामध्ये पर्यटनासाठी गेलेले नाशिकचे ११ पर्यटक तेथील महापुरात अडकले आहेत. त्यामध्ये एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींचा समावेश आहे. संबंधित व्यक्तींच्या नातेवाइकांनी मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे विनंती केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हिमाचल प्रदेशच्या स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला असता, पर्यटक सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.
हिमाचल प्रदेशात महापुराने हाहाकार उडालेला आहे. महापुरामुळे तेथील वीजवितरण व्यवस्था कोलमडली आहे. तसेच रस्ते संपर्कही तुटल्याने ठिकठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. अडकलेल्यांमध्ये शिव सोनवणे, ओम सोनवणे, साहिल पाटील, सत्येन केदार व काैस्तुभ मालाणी या पाच युवकांचा समावेश आहे. हे युवक गुजरातच्या ट्रेल थ्रिलिंग व ॲडव्हेंचर कंपनीमार्फत हिमाचल प्रदेशात ट्रेकिंगसाठी गेले आहेत. परतीच्या मार्गावर असताना महापुराने त्यांना गाठले. यासंदर्भात जिल्हा आपत्ती विभागाने ट्रेल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंडी (हिमाचल प्रदेश) येथील नियंत्रण कक्षाशी सोमवारी (दि. १०) रात्री संपर्क झाला. हे युवक सुखरूप असून, बनाला येथे ११ खोल्या घेऊन ते वास्तव्य करत असल्याचे कंपनीकडून प्रशासनास सांगण्यात आले. या कंपनीसोेबत विविध ठिकाणचे 20 युवक ट्रेकिंगला गेल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालुंजकर फॅमिली हिमाचल प्रदेशात अडकली आहे. त्यामध्ये संकेत लक्ष्मण मालुंजकर, लक्ष्मण निवृत्ती मालुंजकर, स्नेहल संकेत मालुंजकर, मंदा लक्ष्मण मालुंजकर, विहान सागर मालुंजकर तसेच ओवी संकेत मालुंजकर यांचा समावेश आहे. थळोट येथे संबंधितांशी अखेरचा संपर्क झाल्याचे कुटुंबीयांकडून कळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा तेथील स्थानिक यंत्रणांशी सातत्याने संपर्कात आहे.
…तर संपर्क साधावा
हिमाचल प्रदेशात नाशिकची कोणतीही व्यक्ती अडकली असल्यास, तिच्या नातेवाइकांनी मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी तातडीने संपर्क साधावा. मदतीसाठी ०२५३- २३१७१५१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केले आहे.
हेही वाचा :